सोलापुरात भाजपच्या डावात राष्ट्रवादीचा एक्का?

0

सोलापूर । महापालिकेत महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले भाजपने महापौरपदासाठी शोभा बनशेट्टी आणि उपमहापौरपदासाठी शशिकला बत्तूल यांना संधी दिली आहे. 8 मार्चरोजी महापौर निवडणूक आहे. महापौरपदासाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेसची साथ घेणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर महापालिकेत 102 पैकी सर्वाधिक 49 जागा भाजपच्या आहेत. भाजपच्या राजश्री चव्हाण यांना तिसर्‍या अपत्याच्या मुद्यावर न्यायालयाने नगरसेवक म्हणून काम करण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे भाजपचे संख्याबळ सध्या 48 झाले आहे. शिवसेनेकडे 21, काँग्रेसकडे 14, एमआयएमकडे 9, राष्ट्रवादीकडे 4, बसपाकडे 4 आणि माकपचा एक नगरसेवक आहे. बहुमतासाठी भाजपला आणखी चार जागांची गरज आहे. मात्र भाजपने शिवसेनेशी युती न करता बसपा किंवा राष्ट्रवादीची साथ घेण्याचा घाट घातला आहे. भाजपविरोधात महापौरपदासाठी काँग्रेसतर्फे प्रिया जयकुमार माने, शिवसेनेतर्फे कुमूद अंकाराम आणि एमआयएमच्या नूतन गायकवाड यांनी अर्ज भरले आहेत. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे किसन जाधव, शिवसेनेचे अमोल शिंदे व एमआयएमचे अझहर हुंडेकरी यांनी अर्ज भरला.

नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार
महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार यांची निवड झाली आहे. जिचकार यांच्या पारड्यात 108 मते पडली. काँग्रेसच्या तीन नगरसेवकांची अनुपस्थिती ही पक्षासाठी चिंतेची बाब ठरली आहे. 151 सदस्यीय नागपूर महापालिकेत 108 जागा जिंकून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाने ‘सोशल इंजिनीअरिंग’चा प्रयोग केला होता. महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असतानाही या पदासाठी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील नंदा जिचकार यांना उमेदवारी देण्यात आली होती. निवडणुकीत जिचकार यांना अपेक्षेप्रमाणे 108 मते पडली. काँग्रेसच्या स्नेहा निकोशे यांना 26 मते आणि बसपाच्या वंदना चांदेकर यांना 10 मते मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत दीपराज पार्डीकर 80 मतांनी विजयी झाले.