सोलापुरात भाजपला 49 जागा

0

सोलापुर । काँजपा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने आपला झेंडा रोवला आहे. 1962 महापालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व भाजपाने संपुष्टात आणले आहे. 102 जागांच्या महापालिकेत भाजपने निर्विवादपणे 49 जागावर विजय मिळविला आहे.तर काँग्रेसला केवळ 14 जागांवर शांत बसावे लागले. याउलट एमआयएमसारख्या पक्षाने तब्बल 9 जागा जिंकत आपले अस्तित्व नव्याने निर्माण केले. निवडणुकीसाठी भाजपचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि भाजपच्या थिंक टँकने केलेली मोर्चेबांधणी जबरदस्त यशस्वी झाली आहे.

काँग्रेस बालेकिल्ल्यास भुईसपाट; भाजपचे वर्चस्व
काँग्रेसची भिस्त सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या आमदार कन्या प्रणिती यांच्यावरच होती. त्यांनी शहरात राबविलेल्या प्रचार मोहिमेला सोलापूरकरांनी साफ नाकारले .1962 पासूनच्या काँग्रेस बालेकिल्ल्यास भुईसपाट करीत भाजपने अनेक दिग्गजांचे महापालिका निवडणुकीत पराभूत केले. विद्यमान महापौर, उपमहापौर आणि अनेक माजी महापौरांबरोबरच काँग्रेससह राष्ट्रवादी व कॉ. आडम मास्तर यांच्या माकपलाही जबरदस्त धक्का दिला. महापालिकेच्या सत्ताकारणात दीर्घकाळ स्व. तात्या तथा विष्णुपंत कोठे यांची प्रमुख भूमिका होती. तीच भूमिका पार पाडण्यासाठी त्यांचे चिरंजीव महेश कोठे यांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेऊन तब्बल 21 जागा सेनेच्या खात्यात जमा केल्या. राष्ट्रवादीचे सर्व नेते पराभूत होवून संख्या 4 वर आली. बसपाने चार जागा सुरक्षित केल्या. एकूणच एका ऐतिहासिक विजयाची नोंद करताना भाजपच्या सुभाषबापू व मालकांनी महापालिकेची मोहीम यशस्वी केली. काँग्रेस पक्षाला मोठ्या पराभवाचे तोंड पहावे लागले असुन राष्ट्रवादीचीही पिछहाट झाली आहे.

भाजपला मोठे यश
बार्शीच्या राजेंद्र राऊत यांच्यासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील भाजपने जि.प.-पंचायत समिती निवडणुकीत केला. स्वत:च्या कमळ चिन्हावर 15 सदस्य जिल्हा परिषदेत धाडण्यात भाजपला यश मिळाले. खा. विजयसिंह मोहिते-पाटील, त्यांचे चिरंजीव रणजितसिंह व पुतणे धैर्यशील यांनी मात्र माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीच्या गडावरील हल्ल्यांना परतवून लावण्यात यश मिळविले आहे. 11 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आणण्याची किमया मोहिते-पाटलांनी केली. 68 सदस्य संख्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने 23, भाजपने 15 तर स्थानिक आघाड्यांनी 23 तर काँग्रेसने केवळ 6 सदस्य निवडून आणण्यात यश मिळविले आहे.