सोलापूर – राज्यभरात अत्यंत वेगळेगळ्या कारणाने रेल्वेचे अपघात घडत असतात. त्यातल्या त्यात स्टंटबाजीत मृत्यू झालेल्यांची संख्या हल्ली वाढलेली दिसते. त्याचबरोबर हलगर्जीपणामुळे अपघात झालेल्यांचीही संख्या कमी नाही. सोलापुरात अशाच हलगर्जीपणामुळे झालेल्या अपघाताचा प्रत्यय सोलापुरात आला आहे. रेल्वे डब्याच्या दारात उभे राहुन बोलत असताना हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. सुदैवाने यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला नसून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काही दिवसांपुर्वी सोलापूर स्थानकावर हुतात्मा एक्सप्रेस येत असताना हा प्रकार घडला. हुतात्माच्या डी 4 हया क्रमाकांच्या डब्याच्या दारात उभे राहुन रेवणसिध्द बागलकोटे बोलत होते. याच वेळी पाठीमागच्या प्रवाशाचा धक्का लागल्याने बागलकोटे हे डब्यातुन खाली कोसळले. रेवणसिध्द यांनी प्रसंगावधान राखुन जीव वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला. एव्हाना हा प्रकार अन्य प्रवाशांच्या लक्षात आला. त्यांनी रेवणसिध्दना वाचविण्यासाठी डब्यातील चैन ओढली. रेल्वेचा वेग जरी कमी झाला असला तरी त्या दरम्यान सात डबे हातावरुन गेले होते.
गाडी थांबल्यानंतर प्रवाशांनी रक्ताच्या थारोळयात रेवणसिध्दांना पाहिले. ताबडतोब याची माहिती रेल्वे प्रशासनाला व रेल्वे पोलिसांना मिळाली. काही मिनीटातच रेल्वेचे डॉक्टर घटनास्थळी पोहचले. प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र घटना गंभीर असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. या दरम्यान रेल्वे पोलिसांनी तुटलेल्या हाताचा शोध सुरू केला. काही वेळाच्या शोधानंतर त्यांना तो मनगटापासुन तुटलेला हात मिळाला. तो हात पोलिसांनी प्लॅस्टीकच्या पिशवीत घालुन रेवणसिध्दांची पत्नी स्नेहा यांच्या हाती सोपविला. यावेळी त्यांच्या पत्नीला पिशवीत काय आहे ह्याची थोडीही कल्पना नव्हती.
खासगी रुग्णालयात उपचार सुरू
जखमी रेवणसिध्द बागलकोटे यांना सुरुवातीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हॉस्पिटल प्रशासनाकडुन अपेक्षित असा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नुकतीच त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तो हात जोडता आला नाही. बुधवारी पेलवीसची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
कुटुंबाला मदतीची अपेक्षा
आत्तापर्यत उपचारासाठी सुमारे 3 लाख रुपयांचा खर्च आला. पेलवीस शस्त्रक्रियेनंतर यात आणखी भर पडेल. रेल्वेकडुन आर्थिक मदत व पतीला रोबोटीक हात मिळावे अशी विनंती पत्नी स्नेहा बागलकोटे यांनी केली आहे.