17 कोटीचा मंजूर निधी ‘एचसीएमटीआर’ला वर्ग करणार
पुणे : मुंढवा येथील पुणे-सोलापूर रेल्वे क्रॉसिंगवर उच्च क्षमता वर्तुळाकार वाहतूक मार्गासाठी (एचसीएमटीआर) पूल बांधण्यासाठी सुमारे अकरा कोटींच्या वर्गीकरणाला स्थायी समितीने मान्यता दिली. सोलापूर रस्त्यावर बीआरटी मार्ग विकसित करण्यासाठी अंदाजपत्रकातील निधीतून हे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी हडपसरपर्यंत मेट्रो होणार असल्याचे कारण देण्यात आले आहे. मात्र, मेट्रोची घोषणा अद्याप हवेतच असताना ‘बीआरटी’च्या निधीवर डल्ला कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गेल्या काही वर्षांत मुंढवा परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असून, या भागातील लोकसंख्याही वाढली आहे. या परिसरात एचसीएमटीआर रस्त्यासाठी पुणे-सोलापूर रेल्वे क्रॉसिंगवर पूल प्रस्तावित आहे. त्यामुळे या भागातील कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या पुलासाठी वर्गीकरणाद्वारे अकरा कोटी रुपये उपलब्ध करून द्यावे, असा प्रस्ताव होता. बीआरटी विकसित करण्यासाठी अंदाजपत्रकात 17 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हडपसरपर्यंत मेट्रो होणार असल्याने हे वर्गीकरण करण्यात आल्याचे योगेश मुळीक यांनी सांगितले. हे वर्गीकरण करण्यासाठी स्थायी समितीने गुरुवारी मान्यता दिली.
मेट्रोमुळे गरज नाही
पुलासाठी ‘बीआरटी’चा निधी वळविल्यासंदर्भात विचारणा केली असता हडपसरपर्यंत मेट्रो होणार आहे. त्यामुळे ‘बीआरटी’ची गरज नाही, असे मुळीक यांनी सांगितले. त्यावर सातारा रस्त्यावरही बीआरटी असून, तिथेही मेट्रो प्रस्तावित असल्याचे दाखले दिले असता त्यावर त्यांनी मौन बाळगले. सोलापूर रस्त्यावर हडपसरपर्यंत बीआरटी विकसित करण्यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे.