मुंबई | सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव अद्याप आला नाही. भविष्यात जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून सोलापूर विद्यापीठाचे नाव तसेच ठेवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतल्याचे कळवले आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६ मे २०१६ रोजी एका बैठकीत या विद्यापीठाचे नाव बदलण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले होते, असे तावडे यांनी जयवंत जाधव यांच्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले आहे. राज्यातल्या शिक्षण विभागाने सुरू केलेल्या १२० व्हिडिओ कॉन्फरन्स केंद्रांपैकी ९७ केंद्रे बंद असल्याचे आढळून आले आहे, असे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मान्य केले. अनिल भोसले यांच्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. जिल्हा परिषदांच्या सेवेत कायम झालेल्या वस्तीशाळा शिक्षकांना तसेच निम शिक्षकांना टीईटीमधून वगळण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यात आली आहे, असेही तावडे यांनी कपिल पाटील यांच्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले. बीड जिल्हा परिषदेच्या वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या ७९३ शिक्षकांचं वेतन थकले असून ही रक्कम ३५ कोटी ९१ लाखांपेक्षा जास्त असल्याचे त्यांनी विनायक मेटे यांच्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले आहे. मराठवाड्यात औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शास्त्र विद्यापीठाचे प्रादेशिक केंद्र तसेच नांदेड येथे उपप्रादेशिक केंद्र स्थापन करण्यात येत असल्याचे तावडे यांनी अमरसिंह पंडित यांच्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले. राज्यातल्या नर्सरीच्या प्रवेशांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी धोरण आखण्यात येत असल्याचे विनोद तावडे यांनी डॉ. अपूर्व हिरे यांच्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात स्पष्ट केले. मुंबई विद्यापीठाने येत्या शैक्षणिक वर्षात शंभर टक्के परीक्षा शुल्कवाढ प्रस्तावित केली आहे. पदवी, पदव्युत्तर, एम.फील., पीएचडी, अशा सर्व अभ्यासक्रमांसाठी ही शुल्कवाढ होणार आहे, असे त्यांनी हुस्नबानू खलिफे यांच्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले आहे. ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून पालघर जिल्हा तयार करण्यात आला असला तरी तेथे अद्याप वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालय स्थापन करण्याची कार्यवाही पूर्ण झाली नसल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बाळाराम पाटील यांच्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात मान्य केले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या १२२८ वृद्ध कलाकारांच्या मानधनाचे प्रस्ताव समाजकल्याण विभागात गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सतेज पाटील यांच्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात मान्य केले. राज्यात दोन मे २०१२ पासून शिक्षक भरती बंद करण्यात आली असली तरी यातून गणित, इंग्रजी व विज्ञान विषयाच्या शिक्षक भरतीला मान्यता देण्यात आली असल्याचे तावडे यांनी दत्तात्रय सावंत यांच्या एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.