‘सोशल’ची जबाबदारी पालिका अधिकार्‍यांवर

0

पुणे । पुणे महापालिकेने दोन वर्षांपूर्वी फेसबुक पेजसह ट्विटर हँडल सुरू केले. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने आता या सोशल मीडियावरील प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी पालिकेच्या कर्मचार्‍यांवर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या फेसबुक पेजला लाईक’ करण्यासह ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे प्रशासकीय आदेश या कर्मचार्‍यांना संगणक आणि सांख्यिकी विभागाने दिले आहेत.महापालिकेच्या वेगवेगळ्या सेवा-सुविधांचा प्रसार आणि प्रचार वेगाने व्हावा, यासाठी पालिका प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे. मात्र, यातील सोशल मीडियाला पाहिजे, तसा प्रतिसाद मिळत नसल्याने आता यावर कर्मचार्‍यांनाच अ‍ॅक्टिव्ह करण्याचा आदेश प्रशासनाने काढला आहे. सोशल मीडियाचा वाढता वापर लक्षात घेऊन महापालिकेने आपल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी फेसबुक पेजसह ट्विटर हँडल सुरू केले आहे.

फक्त 10 हजार लाईक्स
फेसबुक पेजसह ट्विटर हँडल करण्यासाठी खासगी सल्लागार तसेच काही कंपन्यांना पैसे देऊन त्याचे कामकाज पाहिले जात होते. असे असतानाच तब्बल 35 लाख लोकसंख्या असलेल्या पुणे शहरात पालिकेच्या फेसबुक पेजला अवघे 10 हजार लाईक्स आहेत. तर ट्विटर हँडलचे अवघे 8 हजार फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियामध्ये महापालिका मागे पडत असल्याने आता पालिकेच्या 18 हजार कर्मचार्‍यांना या लाईक्स वाढविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी हा आदेश काढल्याचे प्रशासनाने सांगितले.