नंदुरबार (रवींद्र चव्हाण) । श्रावण सरींच्या पावसाने सर्वत्र थंडगार वातावरण निर्माण केले असतांनाच नंदुरबार नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय वातावरण गरमागरम होऊ लागले आहे. पोस्टारबाजीतून सत्ताधारी गटावर निशाणा साधत प्रकाश भोई यांनी आरोपांची तोफ डागायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या समर्थकांनी पोस्टर बनवून नंदुरबारसाठी चंदू भैयाच पाहिजे, असे उत्तर दिले आहे. काहींनी तर रोख सके तो रोख लो… असा व्हिडीओ बनवून व्हायरल देखील केला आहे.यामुळे निवडणूक मैदानावरचे हे राजकीय नाट्य सोशल मीडिया तसेच व्हाट्सएपच्या माध्यमातून रंगू लागले आहे.
एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
सध्या श्रवण महीन्याची झडी सुरू असून दररोज सरीवर सरी बरसत आहे. यामुळे सगळीकडे हिरवळ पसरली असून थंडगार वातावरणाचा सुखद अनुभव लोकं घेत आहे. नगरपालिका निवडणूकिला अजून किमान दोन महिने बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, काँग्रेस, आणि शहरविकास आघाडी यांच्या प्राथमिक स्वरूपात बैठका देखील झालेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच वार्डनिहाय आरक्षणही जाहीर झाले आहे. यातून निवडणूकीचे बिगुल वाजले असल्याने राजकीय वातावरण तापणे साहजिकच आहे. सत्ताधारी काँग्रेस गटाच्या विरुद्ध उघड आरोप अजून कुणी केलेला नाही. परंतु प्रकाश भोई यांनी सोशल मिडियातुन आरोपांच्या फ़ैरी झाडायाला सुरुवात करून दिली आहे. नगरपालिकेतील भ्रष्टाचार आपण पुराव्यासह सिद्ध करणार….मी पण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार,? अशी पोस्टारबाजीतून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यात अनेक गोष्टी सांगून सोशल मीडियावर राजकीय चर्चा घडवून आणण्याची भूमिका निभावली आहे. यावर आ, रघुवंशी यांच्या समर्थकांनी ठोस उत्तर न देता चंदू भैया शिवाय पर्याय नाही,एवढेच पोस्ट करून उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. काहीही असो मात्र राजकिय वातावरणाची चर्चा या निमित्ताने शहरात आता होऊ लागली आहे. त्याची झलक जास्त करून येणार्या गणेशोत्सवात पाहायला मिळणार आहे हे मात्र तेवढेच खरे…