सोशल मिडीयात फोटो व्हायरल करणार्‍या नगरसेविका पूत्रास चोप : सात जणांविरोधात गुन्हा

शहरात बंदोबस्त वाढवला : राजकीय वातावरण तापले : महिलेला मारहाण प्रकरणी दोनशे जणांविरोधात दंगलीचा गुन्हा

Son of corporator beaten up in Muktainagar: Crime against seven people मुक्ताईनगर : सोशल मिडीयात तरुणीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर नगरसेविका पूत्रास महिलेसह तिच्या मुलीने व शिवसेनेचे छोटू भोई यांच्यासह अनेकांनी चोप दिला होता. या प्रकरणी दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या मांडून आंदोलन केले होते. या प्रकरणी संशयीतांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर संतप्त जमावाने एका भागात जावून दहशत निर्माण केल्याने या प्रकरणी देखील गुन्हा दाखल झाला होता तर सार्वजनिक चौकात राष्ट्रवादीच्या नगरसेविका पूत्रास मारहाण केल्याप्रकरणी आता सेनेच्या पदाधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नगरसेविका पूत्रास मारहाण : यांच्याविरोधात गुन्हा
नगरसेविका पूत्र तथा कंत्राटदार अमीनखान अहमदखान (42, मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीनुसार, एका तरुणीचे फोटो त्यांनी सोशल मिडीयात टाकल्याच्या कारणावरून संशयीत आरोपी छोटू भोई, आकाश भोई, अमोल भोई, अनिकेत भोई, बंडू काळे, रुपाली प्रभाकर पाटील, नेहा प्रभाकर पाटील (सर्व रा.मुक्ताईनगर) यांनी शुक्रवारी दुपारी दिड वाजता प्रवर्तन चौक ते राज टायरकडे जाणार्‍या रस्त्यावर रस्ता अडवून चापटा-बुक्क्यांनी तसेच लाकडी काठीने मारहाण केली. तपास पोलिस उपनिरीक्षक परवीन तडवी करीत आहेत.

मुक्ताईनगरातील हल्ल्या प्रकरणी दोनशे जणांविरोधात गुन्हा
शुक्रवारी रात्री आठ वाजता एका गटातील दोनशे जणांचा जमाव लाठ्या-काठ्यांसह दगड घेवून वॉर्ड क्रमांक 12 मधील शिवराय नगरात पोहोचला. यावेळी जमावातील एकाने शकुंतलाबाई अनिल भोई (मुक्ताईनगर) यांना मारहाण केली तसेच जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याने दोनशे दंगेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

भोईवाड्यात एकास मारहाण
संतप्त जमाव शिवराय नगरात पोहोचल्यानंतर तक्रारदार रमेश भिवा कोळी (भोईवाडा, मुक्ताईनगर) हे आवाज ऐकून बाहेर येताच अज्ञाताने त्यांच्या पायावर दगड मारून दुखापत केली. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार मोहम्मंद तडवी करीत आहेत.