आरोपीचे घर जाळल्याप्रकरणी 17 जणांविरुद्ध गुन्हा ; दाखल गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी दुसर्या दिवशीही ठिय्या
भुसावळ- घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी तिलक छोटू मट्टू (वाल्मीक नगर, भुसावळ) यांच्याविरुद्ध सोमवारी पहाटे शहर पोलिसात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. दरम्यान, आरोपीने सोशल मिडीयावर टाकलेल्या पोस्टनंतर संतप्त जमावाने आरोपीच्या घराची तोडफोड केली तर आरोपीवर कारवाईच्या मागणीसाठी रविवारी रात्री तब्बल चार तास शहर पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या मांडत घोषणाबाजी केली. तहसीलदार व पोलिस प्रशासनाने कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव माघारी परतला तर आरोपीचे घर जाळल्याप्रकरणी संशयीतांविरुद्ध गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी जमावाने सोमवारी दुपारी शहर पोलिस ठाण्याबाहेर पुन्हा सुमारे दिड तास ठिय्या मांडल्याने वातावरण तापले होते. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील वाहतूक अन्य मार्गाने वळवली तर समाजातील लोकप्रतिनिधींनी संतप्त जमावाची समजूत काढल्यानंतर तसेच पोलिसांनी 13 डिसेंबरपर्यंत कुठलीही कारवाई न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमावाने ठिय्या मागे घेतल्याने वादावर पडदा पडला.
आक्षेपार्ह पोस्टनंतर जमाव संतप्त
शहर पोलिसांना जमावाने दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, आदर्श बाळू तायडे (मच्छीमार्केट मागे, वाल्मीक नगर, भुसावळ) यांनी त्यांच्या रावडी ग्रुपवर महामानवाच्या कार्याविषयी पोस्ट टाकल्याचा राग आल्यानंतर तिलक छोटू मट्टू आदर्श तायडे यांना दूरध्वनी करून अश्लील भाषेत शिवीगाळ करीत महामानवाविषयीदेखील अनुद्गार काढले. संशयीत तिलकने तायडे यांच्या घरी जावून आदर्श कुठे आहे ? अशी विचारपूस करीत कुटुंबियांना धमकावले तसेच बाळू तायडे यांच्यावर पिस्तुलदेखील रोखत पुन्हा अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. महापुरूषांविषयी काढलेल्या अनुद्गारानंतर आदर्श तायडे यांनी ती ऑडीयो क्लीप मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकल्याने ती शहरात व्हायरल झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पाहता-पाहता कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत दोषी आरोपीवर कारवाईची मागणी केली. यावेळी जमाव वाढत गेल्याने पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलिस ठाण्याभोवती तसेच शहरात विविध भागात बंदोबस्त वाढवला. डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक देविदास पवार, तालुका पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
आरोपीच्या अटकेसाठी जमावाने मांडला ठिय्या
दोषी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागण्यासाठी जमावाने शहर पोलिस ठाण्याबाहेर रात्री ठिय्या मांडला. मध्यरात्री तब्बल 1.40 वाजेपर्यंत जमाव गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शहर पोलिस ठाण्याबाहेर ठाण मांडून होता. तहसीलदार भाऊसाहेब थोरात व पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ठोस आश्वासन दिल्यानंतर जमाव माघारी परतला. दरम्यान, पहाटे रेखा विजय खरात (समता नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार आरोपी तिलक मट्टूविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर पहाटे त्यास अटक केली.
आरोपींविरुद्ध गुन्हा मागे घेण्यासाठीही ठिय्या
आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्या छोटू मट्टू याचे सुरूवातीला जमावाने घर फोडले मात्र मध्यरात्री पोलिसांनी कारवाई आश्वासन दिल्यानंतरही संतप्त जमावाने आरोपीच्या घराला आग लावल्यानंतर छोट्टू मट्टू यांच्या वडिलांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनंतर 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर हा गुन्हा दाखल घेण्याच्या मागणीसाठी संतप्त जमावाने शहर पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. जमावाच्या वतीने रीपांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, लक्ष्मण जाधव, नगरसेवक उल्हास पगारे, पप्पू सुरडकर, सुदाम सोनवणे आदींनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलिस देविदास पवार यांनी 13 डिसेंबरपर्यंत कुठलीही कारवाई केली जाणार नसल्याचे तसेच दोष नसताना कुणाचे गुन्ह्यात नाव आले असल्यास त्याबाबत तपास करून पोलिस कारवाई करतील, असे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला तसेच बाळा पवार यांनीही जमावाची समजूत काढल्यानंतर आंदोलकांनी घराकडे मोर्चा वळवला. सुमारे दिड तास चाललेल्या या आंदोलनाने काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घर जाळल्याप्रकरणी 17 जणांविरुद्ध गुन्हा
देविदास उर्फ छोटू करंजू मट्टू यांचे घर जाळल्याप्रकरणी व कुटुंबियांना मारहाण करीत जिवंत जाळण्याची धमकी दिल्याप्रकरणी नरेंद्र उर्फ बाळा अरुण मोरे, समाधान उर्फ गोर्या निकम, शुभम शशिकांत सोयंके, संदीप मधुकर सपकाळे, गणेश अशोक सपकाळे, रेखा विजय खरात, बाळा उर्फ विजय सारंग पवार, बाळू तायडे, साहिल बाळू तायडे व त्यांची दोन्ही मुले (नावे माहित नाही), विशाल प्रभाकर सपकाळे, मुन्ना वाल्मिक सोनवणे, विशाल रमेश अवसरमल, आकाश रामदास ढिवरे, योगेश देविदास तायडे, धनराज काशीनाथ सपकाळे, विक्रांत सुरेश गायघोले, रींक्या विलास सपकाळे (आंबेडकर नगर, लिंम्पस क्लब, कंडारी) व अन्य 30 ते 40 अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक के.टी.सुरळकर करीत आहेत.