सोशल मिडीया परिवर्तनवादी

0

भुसावळ । सद्य स्थितीत महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. मात्र याला वाचा फोडण्यासाठी सोशल मिडीयासारखे दुसरे माध्यम नाही, सोशल मिडीया हि स्त्रीवादी आहे. त्यामुळे सावित्रीच्या लेकींनी आता अशा माध्यमांचा सकारात्मक वापर करणे आवश्यक आहे. अरब देशांमध्ये झालेल्या क्रांतीत सोशल मिडीयाचा महत्वाचा वाटा आहे. महिलांना आपल्या दैनंदिन जिवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. स्त्रीवादी चळवळींना हि माध्यमे फायद्याची असून सोशल मिडीयाच्या आव्हानांवर स्वार होऊन सकारात्मक परिवर्तनाचे भागीदार व्हा असे प्रतिपादन दै. जनशक्तीचे कार्यकारी संपादक शेखर पाटील यांनी केले. येथील श्रीमती प.क. कोटेचा महिला महाविद्यालयात उत्तर महाराष्ट्र विद्यार्थी कल्याण विभागातर्फे सोशल मिडीया या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून शेखर पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. जे. एस. धांडे होते. प्रास्तविक विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.डॉ. सुमित्रा पवार यांनी केले. तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख प्रा. आशुतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सुत्रसंचालन स्वाती हडप या विद्यार्थीनीने केले. तर पाहुण्यांचा परिचय प्रा. दिपाली पाटील यांनी करुन दिला.

समाजाच्या वतवर्णुकीत माध्यमांनी घडविला बदल
याप्रसंगी मार्गदर्शन करताना शेखर पाटील म्हणाले की, मानवी संवादासाठी माध्यमे आवश्यक आहेत. इंटरनेटचा विकास झाल्यानंतर यात फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप यांसारखे नवनविन माध्यम उदयास आले. आपले शब्द जगापर्यंत पोहचविण्याचे माध्यम म्हणजे नवमाध्यम होय. सध्या वेबसाईट्स, ब्लॉग्ज्, पोर्टल, मॅसेंजर्स या नवमाध्यमांनी आपले जग वेढले आहे. सोशल मिडीयावर कुणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे याचा वापर कसा करणे हे आपल्यावरच अवलंबून आहे. सोशल मिडीया हे विनामुल्य असून जगाच्या संघर्षात जगण्यासाठी सोशल मिडीया आवश्यक आहे. अशा या माध्यमाने समाजाच्या वर्तवणूकीत बदल घडवून आणला आहे.

विधायक वापर व्हावा
ज्याप्रमाणे विज्ञान शाप कि वरदान यावरील बालबोध प्रश्‍नांप्रमाणे सोशल मिडीयाचा वापर करावा किंवा करु नये अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. मात्र ज्याप्रमाणे विज किंवा घरातील गॅस सिलेंडर हि साधने जितकी धोकादायक आहे. परंतु आपण यांचा वापर चांगला केल्याने आपल्याला लाभ मिळतो. मात्र याचा गैरवापर केल्यास या वस्तू प्राणघातक ठरु शकतात त्याचप्रमाणे सोशल मिडीयाचा वापर देखील आपल्यावर अवलंबून आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर वापर करताना शिष्टाचार बाळगणे महत्वाचे आहे. यावर बर्‍याच वेळा खोटे मजकूर टाकले जातात मात्र त्यांची शहानिशा करणे गरजेचे आहे.

सामाजिक उपक्रमांना प्राधान्य
खोटे मजकूर आपल्या नावाने टाकू नका याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. आज सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे पाहिले जात आहे. अशा विधायक कामांसाठी सोशल मिडीयाचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी विद्यार्थीनींना केले. प्रा. के.सी. सुर्यवंशी यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ. सोपान बाराटे, प्रा. निलेश गुरचळ, प्रा. सचिन पंडित, प्रा. गिरीष कोळी, प्रा. निता चोरडीया व विद्यार्थीनींची उपस्थिती होती.