पुणे । सध्याचे युग संगणकाचे आहे. संगणकामुळे देशाचा विकास झपाट्याने झाला. परंतु संगणकाचा वापर चुकीचा होऊ लागल्याने अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर थांबविला पाहिजे. त्यासाठी संगणकाच्या ज्ञानातून विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे, असे आमदार अनंतराव गाडगीळ यांनी केले.
गाडगीळ यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत डि. सी. एम. सोसायटी ऑफ इंडिया संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयास 3 लाख रुपयांचे संगणक संच व 2 लाख रुपयांचे बेंचेस प्रदान करण्यात आले. नाना पेठमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. डि. सी. एम. सोसायटी ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी एम. डी. शेवाळे, खजिनदार विशाल शेवाळे, पर्यवेक्षक वसंत साळवे, समन्वयक हेमलता सांगळे, महाविद्यालयाच्या प्राचार्य शशिकला गोरे, वाल्मिक जगताप, आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.