सोशल मीडियाचा प्रभावी वापर हेच मीरा-भाईंदरमधील भाजपच्या विजयाचे सूत्र

0
मीरा-भाईंदर | एकीकडे विरोधक खोट्या आरोपांची राळ उडवत असताना, फक्त पारदर्शी कारभार आणि विश्वासार्ह विकासाच्या अजेंड्यावर भर देत केलेल्या प्रचाराच्या योग्य नियोजनामुळे मीरा-भाईंदर महापालिका एकहाती सर करण्यात भाजपला यश आले आहे. केंद्रात, राज्यात आणि मीरा-भाईंदर महापालिकेतही भाजपची सत्ता असल्यास आम्ही शहराचा चौफेर विकास करू, या भाजपाच्या ठोस आश्वासनावर मीरा-भाईंदरच्या सुजाण मतदारांनी विश्वास ठेवला. त्याचबरोबर स्थानिक राजकीय समीकरणांचा अभ्यास करून प्रसिद्धी समन्वयक मयूर बोरकर यांनी केलेले प्रसिद्धीचे नियोजन आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर या घटकांनीही भाजपच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
मीरा-भाईंदर महापालिकेवर विजय मिळवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या विरोधी पक्षांनी जंग-जंग पछाडले. शिवसेनेने विजयासाठी तर एक कॅबिनेट मंत्री आणि आमदार खासदारांची फौजच निवडणुकीच्या रिंगणात उतरवली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर महापालिकेवर एकहाती विजयाचे मोठे आव्हान भाजपसमोर, किंबहुना आमदार नरेंद्र मेहता यांच्यासमोर होते. हे आव्हान स्वीकारत मेहता यांनी प्रचाराचे अतिशय शिस्तबद्ध नियोजन केले. भाजपची उमेदवारी देताना समाजाच्या प्रत्येक घटकाला प्राधान्य देत प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी विरोधकांवर सरशी साधली. तर दुसऱ्या टप्प्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना सतत प्रोत्साहित करत शिस्तबद्ध प्रचाराचे नियोजनही केले.
आमदारांच्या नियोजनाच्या जोडीला प्रसिद्धी आणि माध्यम समन्वयक मयूर बोरकर यांनीही प्रसिद्धीचे चांगले नियोजन केले. गेल्या तीन वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारद्वारे करण्यात आलेली विकासकामे मीरा-भाईंदरच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याची कामगिरी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. फक्त पारंपरिक प्रचारावर अवलंबून न राहता साेशल मीडियाचाही प्रचारादरम्यान त्यांनी योग्य आणि प्रभावी वापर केला. मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली बोरकर आणि त्यांच्या टीमने संपूर्ण प्रचार मोहिमेत प्रभावीपणे काम केले. आमदारांच्या मनातील प्रचाराबाबतच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी बोरकर आणि त्यांच्या टीमने अचूक कार्यपद्धतीचा अवलंब केला. मीरा-भाईंदरमध्ये अमराठी मतदारांचे असलेले प्राबल्य लक्षात घेत, त्या अनुषंगाने प्रसिद्धीचे नियोजन करण्यात आले. त्याचसोबत केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या आणि बड्या नेत्यांच्या प्रचाराचे वेळापत्रक, प्रमुख नेत्यांचा प्रचारातील सहभाग आणि त्यांची भूमिका याबाबतची संपूर्ण माहिती प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्यातही बोरकर आणि त्यांच्या टीमचा सिंहाचा वाटा होता. यूट्यूब, ट्वीटर, फेसबुक आणि वृत्तवाहिन्या तसेच वर्तमान पत्रातील जाहिराती यांच्या माध्यमातून भाजप नेतृत्वाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले. व्हाॅट्सअपचा प्रभावी वापर हे देखील या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. 95 प्रभागातील भाजपचे उमेदवार आणि वॉर्ड अध्यक्षांचा समावेश असलेले स्थानिक कार्यकर्त्यांचे 95 व्हॉट्सअॅप ग्रुप बोरकर यांनी तयार केले होते. या ग्रुपच्या माध्यमातून स्थानिक कार्यकर्त्यांशी सततचा संपर्क ठेवल्याने प्रचारात योग्य समन्वय साधला गेला.
या शिवाय बोरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भाजपच्या होर्डींग कॅम्पेनचीही प्रचारादरम्यान चांगलीच चर्चा झाली. विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्याऐवजी मेहता यांनी केलेल्या विकास कामांची प्रसिद्धी करण्यावर तसेच भविष्यातील संकल्पना मतदारांपर्यंत पोहोचवण्यावर बोरकर यांनी लक्ष केंद्रीत केले. त्याचा चांगला परिणाम मतदारांवर झाल्याचे निकालाद्वारे स्पष्ट झाले आहे. अगोदर कल्याण-डोंबिवली महापालिका, त्यानंतर पनवेल महापालिका आणि आता मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपच्या प्रसिद्धीची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल्याने मयूर बोरकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.