पुणे । चित्रपटांना फार पूर्वीपासून वादांना तोंड द्यावे लागले आहे. मात्र, चित्रपटसृष्टीने कधीच ठाम भूमिका घेतली नाही. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे ट्विटचीही भीती वाटते. एखादा चुकीचा शब्द वापरला गेल्यास जोरदार ट्रोलिंग सुरू होते, अशा शब्दांत दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी सद्य:स्थितीवर भाष्य केले. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला मान्यता दिल्यावर त्यावर आक्षेप घेणे चुकीचे आहे, चित्रपटाची संहिता सेन्सॉर होता कामा नये, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.आशय फिल्म क्लबतर्फे आयोजित 8 व्या आशियाई चित्रपट महोत्सवाअंतर्गत दिग्दर्शक मधुर भांडारकर यांची मुलाखत घेण्यात आली. संजय डावरा यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
आणीबाणीबाबत मूलभूत माहिती
समाजातील अनेक विषय महिलाप्रधान दृष्टिकोनातून मांडता येऊ शकतात. दिग्दर्शक एखाद्या चित्रपटावर खूप मेहनत घेतो. तो बोटीवरचा कॅप्टन असतो आणि इतर सर्व प्रवासी असतात. कलाकाराने दिग्दर्शकावर विश्वास ठेवायला हवा. ‘इंदू सरकार’च्या निमित्ताने नवीन पिढीला आणीबाणीच्या काळाबाबत किमान मूलभूत माहिती मिळाली. आणीबाणीबाबत दस्तावेज उपलब्ध नाही, त्यामुळे चित्रपटातून त्यावर भाष्य करता आले. यावर्षी मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार असल्याचे भांडारकर यांनी सांगितले.
दिग्दर्शकांना मार्ग काढता येतो…
राजकीय, ऐतिहासिक, धार्मिक विषयांवर बेतलेले चित्रपट काढताना ‘डिस्क्लेमर’ दिल्यास आक्षेप घेतला जात नाही. चित्रपटनिर्मिती करताना डिस्क्लेमर दाखवणे, पुस्तकावर आधारित चित्रपटासाठी पुस्तकाचे हक्क विकत घेणे, व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी कुटुंबीयांची परवानगी घेणे अशा माध्यमातून दिग्दर्शकांना मार्ग काढता येऊ शकतो.
संवेदनशील समाजाकडून प्रतिक्रिया
काळाप्रमाणे समाज खूप बदलला आहे. ‘इंदू सरकार’च्या वेळी मी अनेक अडचणींचा सामना केला. माझ्यावर आलेली वेळ उद्या कोणावरही येऊ शकते, असे मी ओरडून सांगत असतानाही चित्रपटसृष्टी माझ्या पाठीशी उभी राहिली नाही. ‘पद्मावत’लाही या समस्यांचा सामना करावा लागत आहे. एखाद्या चित्रपटाला जाहीरपणे पाठिंबा दिल्यास भविष्यात आपल्याला अडचणी येतील, विशिष्ट सरकारचा शिक्का बसेल, घरावर मोर्चे येतील, अशी प्रत्येकाला भीती वाटते. संवेदनशील समाजाकडून ताबडतोब प्रतिक्रिया उमटतात, असेही त्यांनी नमूद केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्यांना व्यक्त होण्याचे व्यासपीठ निर्माण झाले आहे. एखाद्या मंदिराला भेट दिली की तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे झालात का, अशी टिप्पणी केली जाते.