पुणे । समाजातील सांस्कृतिक कट्टे हरपल्याने असांस्कृतिक कट्टा वाढीस लागत आहे. सोशल मीडियामुळे या कट्टयांना उत्तेजन मिळत आहे. यामुळे संस्कृती आणि भाषेचा र्हास होत आहे, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कट्ट्याचे उद्घाटन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस दिगंबर दराडे याप्रसंगी उपस्थित होते.
वर्तमानपत्रांतून विचार परिवर्तन
डॉ. मोरे म्हणाले, समाजात असांस्कृतिकता वाढीस लागत आहे. याला आपणच जबाबदार आहोत. हे थांबविण्याची जबाबदारी वर्तमानपत्रांची आहे. समाजातील लोकांची मते आणि विचार परीवर्तन करण्याची जबाबदारी वर्तमानपत्रांची असते. त्यामुळे असांस्कृतिकता थांबविण्याचे काम वर्तमानपत्रे चांगल्यारितीने करू शकतात, असे डॉ. मोरे यांनी सांगितले.
गरज सांस्कृतिक कट्ट्यांची गरज
सांस्कृतिक कट्ट्यांविरूद्ध गावठी कट्टे अशी स्पर्धा निर्माण झाली आहे. अशावेळी समाजातील वातावरण बदलण्याची जबाबदारी वर्तमानपत्रांची आहे. कलेत समतोल राखण्यासाठी सांस्कृतिक कट्ट्यांची गरज आहे. जागतिकीकरणाच्या युगात भाषेसह संस्कृतीचाही र्हास होत आहे. सगळ्या गोष्टी एका पठडीत बसविण्याचा प्रयत्न होत आहे. सांस्कृतिक वैविध्य नष्ट केले जात आहे. याचा गांभीर्याने विचार करून सांस्कृतिक वैविध्य टिकवण्यासाठी पत्रकारितेचा उपयोग होऊ शकतो, असेही मोरे यांनी पुढे सांगितले.
कलेच्याआधारे मूल्यमापन करू नका
कलावंताकडे कलावंत म्हणून पाहिले पाहिजे. त्यांच्या साहित्यकृतीवर आणि कलेच्या आधारे त्यांचे मूल्यमापन करू नये. अनेक प्रतिभावंत कलावंत असतात जे आयुष्य समृद्ध करतात. आज आपण भौतिकदृष्ट्या संपन्न असलो तरी सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आहोत का? याचा विचार करावा, असे प्रा. जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष खुटवड यांनी केले. तर, आभार सुकृत मोकाशी यांनी मानले.