खोपोली । खोपोली कामशेत येथून हरविलेली अल्पवयीन तीन भावंड गुलबर्गा कर्नाटक येथे पोहोचली. या हरवलेल्या मुलांची व पालकांची भेट खोपोलीतील सोशल मीडियाच्या सदस्यांनी घडून आणली. विटभट्टीवर काम करण्यासाठी बाबुराव वाघमारे आपल्या पत्नी व 3 अल्पवयीन मुलांबरोबर आले आहेत. विटभट्टीवर काम करताना येथील एका व्यक्तीबरोबर ओळख झाली होती. वाघमारे यांची 3 अल्पवयीन मुले वसंत बाबुराव वाघमारे, सुरेखा बाबुराव वाघमारे, मंगल बाबुराव वाघमारे यांना काही दिवसापूर्वी ओळखीच्या व्यक्तीने फुस लावून रेल्वेत बसून गुलबर्गा येथे नेले.
मुलांना आणण्यासाठी पोलीस रवाना
या तिघांना गुलबर्गा बाल सुधारक केंद्रात दाखल करुन तपास सुरु केला. तपास करीत असताना मुलांच्या तोंडातून खोपोली शहराचा उल्लेख झाला होता. यावरुन गुलबर्गा पोलिसांनी खोपोली पोलीस स्टेशनला फोन करुन मुलांबाबत माहिती दिली व त्यांचे फोटो व्हाट्सअपवर पाठवले. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक जगताप यांनी गुरूनाथ साठेलकर यांच्याशी संपर्क साधला. साठेलकर यांनी त्यांचा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी असलेल्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर मेसेज टाकला. मुलांचे पालक वीटभट्टी कामगार असल्याची माहिती समजल्यावर साठेलकर, शेखर जांभळे, नकुल देशमुख यांनी वीटभट्टी असलेल्या परिसरात मुलांच्या पालकांचा शोध सुरू केला. बाबुराव वाघमारे नावाचा कामगार याठिकाणी काम करतो असे समजल्यावर सर्वजण बाबूराव यांच्या झोपड़ीजवळ पोहोचले. मोबाईलमध्ये असलेला मुलांचा फोटो बाबूराव आणि त्यांच्या पत्नीने पाहताच त्यांना रडू आवरता आले नाही. मुलांना आणण्यासाठी खोपोली पोलीस रवाना झाल्याची माहिती गुरूनाथ साठेलकर यांनी दिली.