डॉ.युवराज परदेशी:
भारतातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडियाचे माध्यम ‘फेसबुक’ गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध द वॉल स्ट्रीट जर्नलने फेसबुकच्या भारतातील धोरणांबाबत एक लेख प्रसिद्ध केल्यानंतर भाजपा व काँग्रेस पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. समाजात द्वेष आणि घृणा निर्माण करणार्या पोस्टबाबत फेसबुक भारतात केंद्रातील सत्ताधारी भाजप नेत्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या ठपका ठेवण्यात आला आहे. जागतिक पातळीवर फेसबुक वापरकर्त्यांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. यामुळे फेसबुक केंद्रातील सत्ताधारी भाजपाशी ‘पंगा’ घेवू इच्छित नाही, असा दावा द वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे. या अहवालाचा हवाला देत राहुल गांधी यांनी भारतातील फेसबुक आणि व्हॉट्सअॅप भाजप आणि आरएसएसच्या नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात दुभंग आणि द्वेष पसरवण्याचे प्रकार भारतात नवे नाहीत. अफवा तसेच जातीय-धार्मिक द्वेष पसरवून राजकीय लाभ उठवले जातात, हे देखील आता सर्वांना कळून चुकले आहे. कमी अधिक प्रमाणात सर्वच राजकीय पक्ष यात गुंतले आहेत. अर्थातच भाजपाही काही धुतल्या तांदळासारखी नाही मात्र संसदेचे हिवाळी अधिवेशन तोंडावर असताना अचानक उद्भवलेल्या या वादाचा भाजप-काँग्रेसमधील राजकारणापलीकडे धार्मिक धृवीकरणाशी संबंध तर नाही ना? याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे.
2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तेलंगणातील भाजप नेते टी. राजा सिंह यांच्या रोहिंग्या मुस्लिमांबाबतच्या प्रक्षोभक पोस्ट कंपनीच्या धोरणाविरोधात असल्याचा आक्षेप ‘फेसबुक’च्या कर्मचार्यांनी घेतला होता. मात्र, या पोस्टना कर्मचार्यांनी घेतलेले आक्षेप फेसबुकच्या भारतातील धोरण संचालक आँखी दास यांनी फेटाळून लावले. शिवाय, भाजप नेत्यांच्या पोस्टवर कारवाई केल्यास आपल्या भारतातील हितसंबंधांना धक्का पोचू शकतो, असे दास यांनी सांगितल्याचा दावा वॉल स्ट्रीट जर्नलने केल्यानंतर हा वाद पेटला आहे. भारतात फेसबुकच्या वापरकर्त्यांची संख्या 28 कोटी असून जगातील कुठल्याही देशापेक्षा ही संख्या सर्वाधिक आहे. भारतापाठोपाठ अमेरिकेत 19 कोटी, इंडोनेशियात 13 कोटी आणि मेक्सिकोत 8.6 कोटी फेसबुकचे वापरकर्ते आहेत. भाजपनेत्यांच्या विरोधात भूमिका घेतल्यास भारतात फेसबुकच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होईल, अशी भीती फेसबुकला वाटते. फेसबुक इंडियाच्या सार्वजनिक धोरण विभागाच्या संचालक अनखी दास या फेसबुकच्या वतीने केंद्र सरकारकडे लॉबिंग करतात, असेही वॉल स्ट्रीट जर्नलने लेखात नमूद केल्यानंतर काँग्रेसला भाजपाला घेरण्यासाठी आयता मुद्दा मिळाला. राहुल गांधी यांनी ‘भाजप व आरएसएस हे फेसबुक, तसेच व्हॉट्सप यावर नियंत्रण ठेवून खोट्या बातम्या प्रसृत करून जनतेला प्रभावित करतात,’ असे ट्विट केले. यानंतर काँग्रेसकडून कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना ई-मेल पाठविण्यात आला असून, या प्रकरणात फेसबुक हेडक्वार्टरकडून उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कंपनीच्या इंडिया युनिटच्या संचालनाची जबाबदारी नव्या टीमला सोपवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. फेसबुकवर अशाप्रकारचे आरोप अमेरिका आणि ब्राझीलमध्ये लावण्यात आले होते. त्यानंतर तिथे सिनेट आणि संसदेत फेसबुक प्रमुख मार्ग झुकेरबर्ग यांना पाचारण करून विचारपूस करण्यात आली होती, याकडे काँग्रेसने लक्ष वेधले आहे.
भारतात निवडणुकांमध्ये मदत तसेच देशात वैमनस्य आणि घृणेचे वातावरण निर्माण करण्यासाठी भाजप फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचा वापर करीत आहे का? याचीही चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. एवढ्यावरच न थांबता काँग्रेसने पूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) मागणी केली आहे. फेसबुकवर अशा प्रकारचा आरोप पहिल्यांदाच झालेला नाही. अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प यांना फायदा होईल, अशी भुमिका घेतल्याचा आरोप अधून मधून होत असतो. यावर खुद्द झुकरबर्ग यांनी सिनेटसमोर खुलासा केला आहे. भारतातही लोकसभा निवडणुकीदरम्यान फेसबुक वादाच्या भोवर्यात अडकली होती. काँग्रेसने निवडणुकीपूर्वी केंब्रिज ऍनालिटिका आणि फेसबुकशी संगनमत केल्याचे समोर आले होते. हा मुद्दा भाजपाने लावून धरल्याने काँग्रेसला त्याची किंमत देखील चुकवावी लागली होती. तेंव्हा काँग्रेस आरोपीच्या पिंजर्यात होती तर आता भाजपा आहे. यातील मुळ मुद्दा असा आहे की, मुळात फेसबुक ही एक खाजगी व्यापारी कंपनी आहे. त्यांच्या धंद्यासाठी अर्थात फायद्यासाठी ते काहीही करु शकतात, हे सांगायला कुण्या तज्ञाची गरज नाही. मुळ मुद्दा असा आहे की, हा वादा आताच कसा उरकून काढण्यात आला. याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशात धार्मिक धृवीकरणाचा प्रयत्न काही समाजकंटकाकडून करण्यात येत आहे. याचे बोलके उदाहरण म्हणजे दिल्लीपाठोपाठ नुकतीच बंगरुळू येथे झालेली दंगल! दोन्ही ठिकाणचा समान धागा म्हणजे सोशल मीडियावरुन मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्या व पुर्वनियोजित असल्याप्रमाणे दंगा व जाळपोळ झाली. देशात तोंडी तिन तलाक रद्द करण्यात आले, त्यानंतर जम्मू कश्मीरमधून कलम 370 व 35 ए हटविण्यात आले, एनआरसी लागू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रकार वगळता सर्वांनी खुल्या मनाने स्वागतच केले.
एवढेच काय तर 5 ऑगस्टला अयोध्या येथे राम मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा पार पडल्यानंतरही देशातील एकात्मतेला कुठलेही गालबोट लागले नाही. हाच खरा भारत आहे, येथे सर्व धर्माचे आणि पंथांचे लोक गुण्या गोविंदाने राहतात हे 130 कोटी भारतीयांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. मात्र भारताची ही एकात्मता कुण्या परकीय शक्तिंना खुपत असल्याने धर्माच्या नावाने तरुणांची डोकी भडकवली तर गेली नाही ना?, सध्या उफाळून आलेला फेसबुकच्या वादाला तशी किनार तर नाही ना? याची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच देशाच्या शांततेला व अखंडतेला बाधा पोहचवतील असे सर्व प्रकारचे व्हिडीओ व मजकूर देखील फेसबुकसह अन्य समाज माध्यमातून हटविण्यासाठी ठोस कायदे व नियमांची आवश्यकता असल्याचे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले आहे.