सोशल मीडिया दुधारी तलवार; निष्काळजीपणा आयुष्यास वेगळे वळण लावणारा!

0

जळगाव । सोशल मीडिया दुधारी तलवारी सारखी असून त्याचा योग्य वापर केल्यास त्यासारखे परिणामकारक संदेशवहनाचे दूसरे चांगले माध्यम नाही. सोशल मीडियामुळे मिळणाया ज्ञानाचा फायदा आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी निश्‍चित होतो. मात्र थोडासा निष्काळजीपणा आयुष्यास वेगळे वळण लावतो असे प्रतिपादन आय.एम.आर. महाविद्यालयात जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले. जागर स्त्री शक्तिच्या व्याख्यानमाला श्रृंखले अंतर्गत जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने आय.एम.आर. इन्सि.च्या युवती सभेत ’ सोशल मीडिया आणि महिला ’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी महिलांनी सोशल मीडिया वापरतांना घ्यावयाची काळजी या विषयावर प्रभावी सादरीकरण केले.

अभिनव उपक्रम
या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन डॉ. आरती हुजूरबाजार, संचालिका, जळगांव जनता सहकारी बँक, जळगाव, आय.एम.आर.इन्स्टि.च्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे, डॉ. सोमनाथ वडनेरे यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाच्या सुरूवातीस बँकेच्या अधिकारी सौ. जयश्री जोशी यांनी जळगांव जनता सहकारी बँकेच्या कार्यपध्दतीची माहिती सांगितली. सूत्रसंचलन सौ. कविता दसरे यांनी केले. प्रा. शिल्पा बेंडाळे यांनी विद्यार्थीनींना सोशल मीडिया वापरतांना घ्यावयाच्या काळजी विषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्याच बरोबर जळगाव जनता सहकारी बँकेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित अशा विविध उपक्रमांविषयी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनता बँकेच्या प्रकल्प प्रमख सौ. स्वाती भावसार व अधिकारी कर्मचारी तसेच आय.एम.आर. इन्सि.च्या सहकायांनी परिश्रम घेतले.

सोशल मीडियाचे आभासी जग
सोशल मीडियाच्या आभासी जगाविषयी बोलतांना डॉ. वडनेरे म्हणाले की, सोशल मीडिया वापरतांना आभासी जगाच्या अति आहारी गेल्याने नैराश्य, तणावाचा सामना महिलांना करावा लागतो. कारण वास्तव जगातील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, सहानुभूती या मानवीय मूल्यांच्या पेक्षा सोशल मीडियाचे आभासी जग हे अपेक्षा भंग करणारे असते. त्यातून निर्माण होणारे प्रश्‍न आयुष्यास वेगळे वळण लावण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे आभासी जगास न भूलता वास्तव ओळखून डोळसपणे आणि मर्यादित वापर केल्यास सोशल मीडियापासून आपणास फायदा घेता येईल. योग्य वापरासाठी महिलांसाठी डॉ. वडनेरे यांनी काही महत्वाच्या बाबी नमूद केल्यात. त्यात अनोळखी व्यक्तिकडून आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारु नका. जर तुम्हाला संशय असेल तर रिक्वेस्ट आलेल्या व्यक्तिची फेसबुक प्रोफाईल पहा, त्यांचे फ्रेंड सर्कल तपासा, खात्री पटल्यानंतरच रिक्वेस्ट कंफर्म करावे असे सांगितले.