नवी दिल्ली-सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीचा गैरवापर करून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यात येत असल्याचे आरोप होत आहे. तसेच काही प्रकारही समोर आले आहेत. याची भारताने गंभीर दखल घेतली असून अशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मना किंवा तत्सम गोष्टींना कधीही परवानगी मिळणार नाही, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.
अर्जेंटिनातील सलटा येथील जी-२० डिजिटल इकॉनॉमी मिनिस्ट्रिअलच्या बैठकीत ते बोलत होते. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियाचा असा दुरुपयोग करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे याचा असा दुरुपयोग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत कॅम्ब्रिज अॅनॅलिटिका या ब्रिटिश राजकीय सल्लागार कंपनीची सीबीआयकडून प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. या कंपनीवर फेसबुकच्या माध्यमातून अनधिकृतरित्या भारतीयांचा डेटा चोरल्याचे आरोप आहे.