डॉ. खोलेंच्या घरासमोर विविध संघटनांची आंदोलने, सोशल मीडियावरही टीकेची झोड
पुणे : ‘सोवळे मोडले’ म्हणून हवामान खात्याच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांनी निर्मला यादव (वय 50) या मराठा समाजातील स्त्रीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पुणेसह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. यादव या खोले यांच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी येत होत्या. त्यांनी कुळकर्णी आडनाव सांगून, आपल्याकडे नोकरी मिळवली आणि सुवासिनी बाई आहे असे सांगून, आपल्या घरी स्वयंपाक केला, अशी तक्रार डॉ. खोले यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनीही तडकाफडकी गुन्हे दाखल केले होते. तर यादव यांनीही खोटे नाव सांगून नोकरी मिळविलेली नाही. डॉ. खोले यांनी माझ्या घरी येऊन मारहाण केली. तसेच, केलेल्या कामाचा मोबदलाही दिला नाही, अशी तक्रार अभिरुची पोलिस ठाण्यात केली होती. सोवळेप्रकरणात मराठा स्त्रीविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर राज्यभरातून डॉ. खोले यांच्यावर टीका सुरु झाली. वैज्ञानिक महिला कशी जातपात मानते? ब्राम्हण समाजात आजही जातपात मानली जाते, अशाप्रकारची टीका सोशल मीडियासह विविध स्तरातून उमटल्या होत्या. काही संघटनांनी तर खोले यांच्या घरासमोर आंदोलनेही केली होती. तसेच, डॉ. खोले यांच्याआडून पुरोगामी संघटनांनी थेट ब्राम्हण समाजालाच लक्ष्य केल्याने या घटनेला वेगळे वळण मिळत चालले होते. त्यामुळे तक्रार मागे घेऊन प्रकरण मिटविण्यासाठी खोले यांच्यावर दबाव वाढला. तसेच, ब्राम्हण महासंघाने सामंजस्याची भूमिका घेऊन हे प्रकरण मिटविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे अखेर डॉ. खोले यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
डॉ. खोले यांच्या घरी काही धार्मिक कार्यासाठी सोवळ्यातील स्वयंपाक करणारी सुवासिनी असलेली ब्राम्हण स्त्री हवी होती. त्यानुसार, 2016 मध्ये मे महिन्यात त्यांच्याकडे निर्मला कुळकर्णी नावाची एक स्त्री आली होती. देवाच्या कार्यक्रमाचे स्वयंपाक करते, असे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या माहितीवरून डॉ. मेधा खोले यांनी धायरी येथील या महिलेच्या घरी जावूनही चौकशी केली होती. त्यानंतरच निर्मला यांना स्वयंपाकासाठी बोलावले. दोन वर्षात एकूण सहावेळा त्यांनी खोले यांच्या घरी धार्मिक स्वयंपाक केला होता. दरम्यान, निर्मला या ब्राम्हण नसून मराठा असल्याचे खोले यांना त्यांचे गुरुजी जोशी यांनी सांगितले. त्यामुळे खोले संबंधित महिलेच्या घरी गेल्या व त्यांची चौकशी केली असता, त्यांचे नाव निर्मला यादव असे निघाले. खोटे का बोलली व सोहळ्यातील स्वयंपाक करून आमचे देव का बाटविले? असा आरोप करून त्यांना शिविगाळ केली होती. त्यानंतर बुधवारी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तशी तक्रारही दाखल केली होती. पोलिसांनीही तक्रार दाखल करून घेत निर्मला यादव यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले होते. हे प्रकरण प्रसारमाध्यमांनी चव्हाट्यावर आणताच एकच खळबळ उडाली. समाजाच्या सर्वस्तरातून डॉ. खोले यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यांच्या घरासमोर काही राजकीय संघटनांनी आंदोलनही केले. तसेच, सोशल मीडियावरही डॉ. खोले यांना ट्रोल करून त्यांच्यावर टीकेचा भडिमार करण्यात आला. ब्राम्हण महासंघाने ड़ॉ. खोले यांनी तक्रार मागे घेऊन हे प्रकरण मिटवावे, यासाठी दबाव आणला. सर्वस्तरातून दबाव आल्यानंतर डॉ. खोले यांनी शनिवारी सिंहगड रोड पोलिसांत जावून आपली तक्रार मागे घेतली व प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
मराठा-ब्राम्हण वाद पेटण्याआधीच शांत!
हवामान खात्यात संचालिकासारख्या वरिष्ठ पदावर काम करणार्या उच्चशिक्षित स्त्रीने जातीच्या कारणावरून मराठा समाजातील गरीब महिलेविरोधात पोलिसांत तक्रार द्यावी, ही घटना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक प्रतिष्ठेला धक्कादायक ठरली होती. त्यावरून विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी डॉ. खोले यांच्याआडून ब्राम्हण समाजावर टीका करण्यास सुरुवात केली होती. शुद्रांनी उत्पादित केलेले धान्य चालते, त्यांच्याकडून दक्षिणा स्वीकारता मग् त्यांच्या हातचे अन्न का चालत नाही? असा सवाल पुरोगामी संघटना करत होत्या. तसेच, सोशल मीडियावर जर अत्यंत खालच्या स्तरावर जावून ब्राम्हण समाजाविरोधात टीका केली जात होती. याप्रकरणात सिंहगड पोलिसांनी गुन्हे दाखल करून भारतीय राज्यघटनेचा अवमान केल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळे हे प्रकरण सामंजस्याने मिटविण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव आणला गेला होता. वेळीच हे प्रकरण मिटले नसते तर संभाजी ब्रिगेड व इतर पुरोगामी संघटना राज्यभर आंदोलनाच्या तयारीत होत्या. तसेच ब्राम्हणविरुद्ध मराठा अशा वादाने पुन्हा डोके वर काढण्याची भीतीही वर्तविली जात होती.