पुणे : आपण ब्राह्मण तसेच सुवासिनी असल्याचे खोटे सांगून एका ब्राह्मण कुटुंबात सोवळ्याचा स्वयंपाक केल्याप्रकरणी पुण्यातील एका महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. असा गुन्हा दाखल करता येतो का चाचपणी करत पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. मात्र, फिर्यादी गुन्हा दाखल करण्यावर ठाम राहिल्याने पोलिसांनी नमते घेत अखेर त्या महिलेवर गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. हवामान विभागाच्या माजी संचालिका व वैज्ञानिका डॉ. मेधा खोले यांनी याबाबत सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, अशा प्रकारचा गुन्हा दाखल होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. या घटनेनंतर डॉ. खोले यांनी गुन्हा मागे घेऊन प्रकरण मिटवावे. सोहळ्याचा संबंध शुचिर्भूतता व स्वच्छतेशी आहे, जातीशी नाही, अशी भूमिका ब्राम्हण महासंघाने घेतली आहे. गुन्हा दाखल होताच सोशल मीडियावर ब्राम्हण समाजाविरोधात जोरदार टीका सुरु झाल्या होत्या. त्यानंतर ब्राम्हण महासंघाने आपली भूमिका जाहीर केली. गुन्हा दाखल करणार्या सिंहगड पोलिसांवरही सर्वस्तरातून टीकेची झोड उठली आहे.
काय आहे प्रकरण…
सविस्तर असे, की डॉ. खोले या दरवर्षी आपल्या घरी गौरी-गणपती बसवितात. तसेच आई-वडिलांचे श्राद्धही घालतात. त्यासाठी त्यांना सोवळ्यातच स्वयंपाक करणारी महिला हवी होती. मे 2016 मध्ये त्यांच्याकडे एक महिला काम करण्यास तयार झाली. तसेच तिने आपले नाव निर्मला कुलकर्णी असल्याचे सांगत आपण ब्राम्हण व सुवासिनी असल्याचे सांगितले. आपण सोवळ्यात स्वयंपाक करतो असेही त्या महिलेने सांगितले. संबंधित महिलेने सांगितलेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी खोले त्या संबंधित महिलेच्या घरी गेल्या. तेथेही त्यांनी आपण ब्राह्मणच असल्याचे सांगितले. यानंतर खोले यांनी त्या महिलेला गेल्या सव्वावर्षापासून कामावर ठेवले होते. या काळात सप्टेंबर 2016 मध्ये गौरी-गणपती तसेच खोलेंच्या वडिलांच्या श्राद्धाचा सोवळ्यात स्वयंपाक केला. नुकताच झालेला गौरी-गणपतीच्या काळातही त्या महिलेने स्वयंपाक केला. मात्र, यावेळी पूजा करण्यासाठी खोलेंकडे आलेल्या ब्राह्मण गुरूजीने संबंधित महिला ब्राह्मण नसल्याचे सांगितले. त्यामुळे खोलेंनी संबंधित महिलेच्या घरी धाव घेतली. त्यावेळी त्या महिलेने आपले नाव निर्मला यादव असल्याचे सांगितले. अधिक विचारणा केली असता निर्मलाने शिवीगाळ केल्याची व अंगावर धावून आल्याची फिर्याद डॉ. खोले यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात दिली आहे. तर या महिलेने स्वतःवरील आरोप फेटाळून लावले आहेत.
प्रकरण समोपचाराने मिटवा : आनंद दवे
सोवळ्याचा संबंध शुचिर्भूतता आणि स्वच्छता याच्याशी असून, त्याचा जातीशी काहीही संबंध नाही; तसेच फसवणुकीचा जो गुन्हा वयोवृद्ध महिलेविरोधात दाखल करण्यात आला, त्यांच्या वयाचा विचार करता डॉ. खोले यांनी तक्रार मागे घ्यावी आणि हे प्रकरण सामोपचाराने मिटवावे ही आमची भूमिका असल्याचे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले.
सोशल मीडियावर तीव्र पडसाद
या घटनेचे सोशल मीडियावर जोरदार पडसाद उमटले आहेत. काहीजण या प्रकरणाला पाठिंबा देत आहेत तर काहींनी या प्रकारावर कठोर शब्दांत टीका करणार्या पोस्ट फेसबुकवर टाकल्या आहेत. अनेकांनी जात-पात काढणार्यांवर शेलक्या शब्दांत ताशेरे ओढले आहेत तर काहींनी या असल्या प्रकरणांवर उपहासात्मक चिमटे काढले आहेत. सोवळे प्रकरणाबद्दल डोंबिवलीतील शेखर जोशी यांनी ‘घरात सोवळे-ओवळे किती व कसे पाळायचे हा वैयक्तिक प्रश्न आहे. डॉ. मेधा खोले यांनी जी भूमिका घेतली त्यात काही चुकीचे नाही, असे ट्विट करत या प्रकरणाचे समर्थन केले. तर काहींनी हवामान खात्यातील उच्चपदस्थ महिलेकडून अशी अपेक्षा नसल्याचे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तक्रार करणार्या मेधा खोले यांच्यावर टीका करताना ठाण्यातील सौरभ गणपते फेसबुवर लिहीतात, कायद्याचा किस पाडायला गेले तर डॉ. मेधा खोले यांना एकवेळ योग्य ठरवता येईलही. परंतु व्रतवैकल्य, उपास-तापास, सोवळे ओवळे, अनुष्ठान, सवाष्ण, चातुर्मास आणि कसली कसली अडगळ महत्वाची मानणारी महिला हवामान खात्यात एवढ्या उच्चपदावर असते ही लाजिरवाणी गोष्ट आहे. वैज्ञानिक क्षेत्रात जायचे आणि पुराणातले संदर्भ जपत मध्ययुगीन जातीय मानसिकता जपायची. हा देश रामभरोसे जगतो हेच खरे, अशी कठोर टीकाही करण्यात आली आहे.