यावल- तालुक्यातील सौखेडासीम येथील 27 वर्षीय जळीत गर्भवती विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पती छबीलदास रामलाल पाटील व सासू अंजनाबाई रामलाल पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहा छबीलदास पाटील (27) या विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करावा या मागणी करीता मयताच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करण्यापुर्वी यावल पोलिस ठाणे गाठून कारवाईची मागणी 7 रोजी केली होती. नेहा पाटील या गर्भवती विवाहित महिलेला 29 मे रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अत्यवस्थ अवस्थेत उपचाराथर्र् दाखल करण्यात आले होते. ही महिला तब्बल 65 टक्के जळाली होती. नेहाच्या लग्नात ठरल्याप्रमाणे हुंड्याची शिल्लक असलेली निम्मे रक्कम सासरच्या मंडळीस नवीन घराचे बांधकाम वेळी हवी होती. ती न दिल्यामुळे सासरच्या लोकांनी नेहाला जुन्या घरातील जळत्या चुलीवर ढकलून दिल्याचा आरोप मयत विवाहितेची आई रेखा भिमा पाटील (रा. इंदूर (मध्यप्रदेश) यांनी फिर्यादीत केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे, हेड कॉन्स्टेबल संजय तायडे हे करीत आहेत.