सौदीसह 4 देशांचा कतारशी राजनैतिक काडीमोड

0

दुबई । दहशतवादाला खतपाणी घालून आखाती देशांमध्ये अस्थिरता निर्माण करत असल्याचा आरोप करत सोमवारी बहारिन, सौदी अरेबिया, यूएई आणि इजिप्त या देशांनी कतारशी राजनैतिक संबंध तोडत असल्याचे जाहीर केले. बहारिनकडून सोमवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही घोषणा करण्यात आली. कतार हा दहशतवादाला पाठिंबा देत असून बहारिनच्या अंतर्गत गोष्टींमध्ये नाक खुपसत आहे.

सौदी अरेबियाने कतारशी राजनैतिक संबंध तोडल्याचे बहारिनकडून सांगण्यात आले. सौदी अरेबियाच्या कतारमधील नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी 14 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. दहशतवाद आणि अतिरेक्यांना रोखण्यासाठी ही कृती आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण सौदी अरेबियाकडून देण्यात आले. सौदी अरेबियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या सुरक्षिततेला दहशतवाद आणि अतिरेकवादाचा धोका असल्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याने दिलेल्या सार्वभौमत्त्वाच्या अधिकारातंर्गत सौदी अरेबियाने कतारशी राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार कतारशी जमीन, हवाई आणि समुद्रीमार्गे होणारा संपर्क तोडण्यात आला आहे. तसेच सौदीने अन्य आखाती देशांनाही याचप्रकारेच आवाहन केले आहे. दरम्यान, या सगळ्या घडामोडींनंतर इजिप्त व युनायटेड अरब अमिराती (युएई) या देशांनीही कतारशी राजनैतिक संबंध तोडल्याचे वृत्त आहे. इजिप्तने कतार हा दहशतवादी संघटनांना पाठबळ देत असल्याचा आरोप केला. तर यूएईनेही कतारमुळे आखाती परिसरात अस्थिरता निर्माण झाल्याचे म्हटले आहे.