पिंपरी-चिंचवड : ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा हा दिवस सर्वत्र वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. पिंपरी-चिंचवड शहरात वडाच्या झाडाला, मंदिरात तसेच घरी वादाची फांदी आणून तिचे पूजन करण्यात आले. सुवासिनींकडून आपल्या पतीला उत्तम आरोग्य तसेच दीर्घायुष्य लाभावे, असे मागणे सर्व महिलांनी वटवृक्षाकडे मागितले. सणामुळे महिला शृंगार करून वडाची पूजा करण्यासाठी बाहेर पडल्या. यावेळी सुवासिनींनी सौभाग्याचे प्रतिक हळद-कुंकू आणि फणी, करंडा, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तसेच पाच फळे वडाच्या झाडाजवळ अर्पण केले. नंतर झाडाला सात प्रदक्षिणा मारत सूत गंडाळून वटवृक्षाची पूजा केली. शहरातील पिंपरी, चिंचवड, निगडी, सांगवी, वाकड, हिंजवडी, भोसरी यांसह शहरातील सर्वच भागात हा सण उत्साहात साजरा करण्यात आला.