पोलिसांनी पाळला माणुसकी धर्म ; लोहगावच्या विवाहितेला वर्षभरानंतर मिळाले मंगळसूत्र
शिंदखेडा- चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळणे तशी तर दुर्मीळ बाब मात्र दोंडाईचा पोलिस यास अपवाद ठरले. सौभाग्याच्या लेण्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्यानंतर चोरट्यांच्या मुसक्या आवळत मंगळसूत्र जप्त करून वर्षभरानंतर तक्रारदाराच्या घरपोच जावून सौभाग्याचे लेणं परत करत दोंडाईचा पोलिसांनी माणुसकी धर्म जोपासत पोलिसांमध्ये माणुसकीचा झरा जिवंत असल्याचा प्रत्यय दिला. धुळ्यातील कार्यक्रमात विवाहितेला मंगळसूत्र देण्याऐवजी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी थेट विवाहितेच्या घरी जावून मंगळसूत्र देण्याच्या सूचना केल्यानंतर मंगळसूत्रासह चिमुकल्यांना भेटवस्तू आणून पोलिसांनी तक्रारदार कुटुंबाला आणखीनच सुखद धक्का दिला.
लोहगावच्या विवाहितेला मिळाले अखेर सौभाग्याचे लेणे
तालुक्यातील विखरण येथे यात्रेनिमित्त आलेल्या लोहगावच्या विवाहितेचे 16 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबवले होते तर या प्रकरणी दोंडाईचा पोलिसात 31 ऑक्टोबर 2017 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोंडाईचा पोलिसांनी या प्रकरणी तपासचक्रे फिरवून मायाबाई श्रावण कोसले, जनाबाई भगवान खलसे (देवपूर, पंचवटी, धुळे), शैलाबाई सागर कासोटे, सपना हिरा (मोहाडी, धुळे) या चौघांना अटक करून त्यांच्याकडून मंगळसूत्र हस्तगत केले होते. न्यायालयाने तक्रारदारांना मुद्देमाल परत करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिस स्थापनादिनाचे औचित्य साधून 7 जानेवारी रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रारदार विवाहिता शुभांगी प्रमोद पाटील यांना सौभाग्याचे लेणे परत दिले जाणार होते मात्र विवाहितेला लहान बाळ असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी विवाहितेच्या गावी जावून मंगळसूत्र परत देण्याच्या सूचना केल्याने 5 रोजी अधिकार्यांनी लोहगाव गाठून विवाहितेला मंगळसूत्र परत केल्याने महिलेलाही गहिवरून आले व पाटील कुटुंबियांनी पोलिस प्रशासनाला धन्यवाद देत आभारही मानले. अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.