नवलकिशोर राम पुण्याचे नवे जिल्हाधिकारी
राज्यातील 25 सनदी अधिकार्यांच्या बदल्या
पुणे : राज्य सरकारने राज्यातील 25 वरिष्ठ सनदी अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. जिल्हाधिकारी सौरव राव यांना पुणे महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली असून, औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. पुणे महापालिकेत सर्वाधिक काळ आयुक्त म्हणून काम पाहणारे कुणाल कुमार यांची केंद्रात गृहनिर्माण विभागाच्या सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी 6 एप्रिलरोजीच पदभार सोडला होता तेव्हापासून आयुक्तपद रिक्त होते. आता सौरभ राव हे मंगळवारी आपला पदभार स्वीकारणार आहेत.
कुणाल कुमार केंद्रात गृहनिर्माण विभागाचे सहसचिव
राज्य सरकारने प्रशासकीय यंत्रणेत मोठ्या प्रमाणात खांदेपालट केला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली असून, औरंगाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आरदड यांची अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. जालनाचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची मुंबईचे जिल्हाधिकारी म्हणून तर पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची पुण्यातच पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. एकूण 25 वरिष्ठ सनदी अधिकार्यांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या आहेत. पुणे महापालिकेत सर्वाधिक काळ आयुक्त म्हणून काम पाहणार्या कुणाल कुमार यांची केंद्रात गृहनिर्माण विभागाच्या सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी दि. 6 एप्रिलला पदभार सोडला. तेव्हापासून हे पद रिक्त होते. अतिरिक्त आयुक्त शीतल उगले हा या पदाचा कारभार पाहत होत्या. त्यांच्यानंतर आता हे पद कोणाकडे जाते याकडे अनेकांचे लक्ष होते. जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या नावाची चर्चा होती. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले. आयुक्त कुणाल कुमार यांनी पदभार सोडल्यानंतर 10 दिवसांनी पुणे महापालिकेला आयुक्त मिळाले. ते मंगळवारी पदभार स्वीकारतील.