स्काऊटमुळे संकटे पेलण्याची मिळते ताकद

0

शहादा । स्काऊटमुळे जीवनाला विद्यार्थिदशेतच शिस्त लागते श्रमाचे महत्त्वही कळते. स्काऊटच्या शिबिरांतून कलागुणांना वाव मिळतो, भविष्यातील संकटे पेलण्याची ताकद मिळते, असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी केले. येथील वसंतराव नाईक शैक्षणिक संकुलात झालेल्या सहविचार बैठकीत ते बोलत होते. या वेळी वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे समन्वयक संजय राजपूत, विद्यालयाचे पर्यवेक्षक सुनील सोमवंशी आदींसह 37 शिक्षक उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ.राहुल चौधरी पुढे म्हणाले की, देशाची सद्यस्थिती पाहता समाजाच्या विकासासाठी स्काऊटची चळवळ जिवंत ठेवणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. तसेच शिक्षकांनी स्काऊट-गाइड या दोघांवर लक्ष केंद्रित करावे. विद्यार्थिदशेत स्काऊटच्या माध्यमातून व्यावहारिक ज्ञान मिळते, असेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे
संजय राजपूत म्हणाले की, स्काऊटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे मिळतात. त्यामुळे स्काऊटमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहित करावे, असेही ते म्हणाले. जिल्हा स्काऊट-गाइड संघटनेचे कार्याध्यक्ष नरेद्र गुरव यांनीही मनोगत व्यक्त केले. स्काऊट-गाइडची 31 आगस्टपर्यंत नोंदणी करावी, इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी किमान दोन तास द्यावे, वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. जिल्हा संघटक महेंद्र वसावे जिल्हा संघटक कविता वाघ हे या वेळी उपस्थित होते. सावंत यांनी सूत्रसंचालन केले. या बैठकीत स्काऊट-गाइड शिक्षकांच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली.