मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील पश्चिम उपनगरांमध्ये विविध ठिकाणी असणार्या स्काय वॉक व उड्डाणपुलांखालील सुमारे 1 लाख 4 हजार चौरस फुटांच्या जागेत सात अभिनव उद्याने उभारण्यात येणार आहेत. ज्यामध्ये स्काय-वॉकच्या खांबांवर आकारास येणार्या 2 उभ्या उद्यानांचाही समावेश आहे. या उद्यानांमध्ये एलईडी दिव्यांचा वापर केला जाणार आहे. दरम्यान, काही उद्यानांमध्ये विविध रंगी झाडे, हिरवळ, बसण्यासाठी बाक, जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळणी, कुंपण आदी गोष्टी असणार आहेत. याच प्रकारची 6 अभिनव उद्याने शहर भागात, तर 9 पश्चिम उपनगरांमध्ये फुलविण्यात येणार आहेत. विविध प्रकारच्या पुलांखालच्या 3 लाख, 14 हजार, 326 चौरस फुटांच्या जागेत 22 उद्याने विकसित होणार असून यापैकी 7 उद्याने ही उभी उद्याने असणार आहेत, अशी माहिती उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशीयांनी दिली आहे.
गोरेगांव पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल, अंधेरी येथील गोखले उड्डाणपूल, जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल, गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपूल, दहिसर स्टेशन (पूर्व) स्काय वॉक, दहिसर स्टेशन (पश्चिम) स्काय वॉक, दहिसर आनंदनगर उड्डाणपूल, तर पश्चिम उपनगरांतील विविध स्काय वॉक व उड्डाणपुलांखाली 7 उद्याने साकारण्याचे प्रस्तावित असून यामध्ये 4 उभ्या उद्यानांचा समावेश आहे. या उद्यानांच्या उभारणीसाठी रुपये 3 कोटी 31 लाख एवढा खर्च अंदाजित आहे. तर शहर भागातील पुलांखाली 6 उदयाने प्रस्तावित असून यामध्ये 3 उभ्या उद्यानांचा समावेश आहे. या उद्यानांसाठी रुपये 4 कोटी 96 लाख एवढा खर्च अंदाजित आहे. पूर्व उपनगरांमध्ये 9 उद्याने साकारली जाणार असून त्यासाठी रुपये 7 कोटी 33 लाख एवढा खर्च अंदाजित आहे.