स्कूलबस फिटनेस तपासणीसाठी आता शाळांकडून मागविली माहिती

0

पुणे । न्यायालयाच्या आदेशानसार शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या स्कूलबससेची फिटनेस तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. तरी देखील अनेक स्कू लबसचालकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. या पार्श्‍वभूमिवर आता शाळांनाच विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येणार्‍या खासगी गाड्यांची संख्या, चालक यांची पूर्ण माहिती अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पोलीस, परिवहन आणि शालेय विभागाची संयुक्त बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.

शाळेमध्ये विद्यार्थ्यी वाहतुकीसाठी असलेल्या परिवहन समितीचे अध्यक्ष, सदस्य यांच्यासह विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी येणारी वाहने, वाहनांची संख्या, वाहनचालक यांची सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे. तसेच आरटीओने www.schoolbussafetypune.org ही वेबसाईट उपलब्ध करुन दिली असून यावर 26 तारखेपर्यंत माहिती अपडेट करण्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी बैठकीला उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, पिंपरी कार्यालयाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, बारामती कार्यालयाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वाळीव, जिल्हा परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक गौतम शेवाडे, वाहतूक पोलिस निरीक्षक विजय बाजारे आदी उपस्थित होते.

खासगी वाहनातून होतेय असुरक्षित वाहतूक
शुक्रवारपासून (दि.15) शहरातील शाळांना सुरुवात झाली. अनेक शाळांतील विद्यार्थ्यांची खासगी रिक्षा आणि ओम्नी वाहनातून असुरक्षित वाहतूक करण्यात येते. यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचण्याची शक्यता असते. या पार्श्‍वभूमीवर आरटीओकडून शिक्षण विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

केवळ 1400 वाहनांची फिटनेस तपासणी
स्कूलबसेसच्या फिटनेस तपासणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) 18 जूनपर्यंत मुदत दिली होती. मात्र, तरीदेखील शहरातील केवळ 1400 वाहनांनी फिटनेस तपासणी केली असून जवळपास अडीच हजार वाहनांची फिटनेस तपासणी झालेली नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात अनफिट वाहने रस्त्यावर धावत असून यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी आरटीओत शालेय, पोलिस आणि परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक झाली. शाळेत येणार्‍या गाड्यांची संख्या, त्यांची फिटनेस तपासणी, स्कूलबसमधील सोयीसुविधा, गाडीचालकासंबंधी शाळेने ठेवायची माहिती याबाबत यावेळी चर्चा झाली.