पुणे । शालेय वाहतूक धोरणाच्या नियमांची पायमल्ली करून विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या 75 वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत वाहनधारकांकडून 1 लाख 23 हजार 300 रुपयांचा दंड आणि 6 हजार 579 रुपयांचा थकीत कर वसूल करण्यात आला आहे. तसेच 75 पैकी 52 वाहने जप्त केली आहेत.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शालेय विद्यार्थी वाहतूक करणार्या वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेसाठी आरटीओने सहा पथके नेमली असून, प्रत्येक पथकात तीन मोटार वाहन निरिक्षकांचा समावेश होता. शहर आणि उपनगरात गुरुवारी आणि शुक्रवारी 350 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 75 वाहने दोषी आढळली. जप्त केलेली वाहने आरटीओ कार्यालय आणि पीएमपीएलच्या स्वारगेट आणि कोथरुड डेपो येथे ठेवण्यात आली आहेत.
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना वैध परवाना नसणे, स्कूल बसच्या योग्यता प्रमाणपत्राची संपलेली मुदत, विद्यार्थी वाहतूक धोरणाची पूर्तता न करणे, वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणे आदी प्रकार तपासणीमध्ये आढळून आले. दरम्यान, विनापरवाना शालेय विद्यार्थांची वाहतूक करू नये, विद्यार्थी वाहतूक करणार्या सर्व वाहतूकदारांनी शालेय परिवहन धोरणातील तरतुदींचे पालन करावे, शाळा प्रशासनाने बस कंत्राटदारांबरोबर आवश्यक ते परस्पर सामंजस्य करार करावेत, पालकांनी त्यांच्या पाल्यांना अधिकृत स्कूल बसमधूनच शाळेत पाठवावे, असे आवाहन आरटीओने विद्यार्थी वाहतूकदार व पालकांना केले आहे.
…तर कारवाई अटळ
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या वाहनांवर येत्या काळात कारवाई सुरूच राहणार आहे. दोषी वाहनांचा परवाना निलंबन, नोंदणी क्रमांक रद्द करणे आदी प्रकारची कडक कारवाई करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी वाहन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केल्यास कारवाई अटळ आहे, असा इशारा आरटीओने दिला आहे.