हिमाचलमधील कांगडामध्ये भीषण अपघात
धर्मशाला : हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील नुरपूर परिसरात सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास स्कूल बस 100 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात 29 विद्यार्थी ठार झाले. या भीषण अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले होते. एनडीआरएफचे पथक घटनास्थळावर पोहोचले होते. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मृतांचा आकडा 29 वर पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले. या भीषण अपघाताची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
घटनास्थळी स्थानिक, डॉक्टरांचे पथक, एनडीआरएफचे पथक दाखल झाले होते. कांगडा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संतोष पटियाल यांनी सांगितले की, दुर्घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळावर पोहोचलो. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व मृत विद्यार्थी हे 10 वर्षांच्या आतील आहेत. बसचा चालक आणि दोन शिक्षकांचाही मृतांमध्ये समावेश आहे. वझीर रामसिंग पठानिया मेमोरियल पब्लिक स्कुलचे एकूण 45 विद्यार्थी शाळेतून घरी परतत असताना घाटामध्ये बस घसरली आणि थेट दरीत कोसळली. मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.
अपघाताच्या चौकशीचे आदेश
हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले, मी राज्याच्या मुख्य सचिवांशी बोललो असून, एनडीआरएफची तुकडी घटनास्थळी पोहचली आहे. या अपघाताच्या चौकशीचेही आदेश ठाकूर यांनी दिले आहेत. काही जखमींना पंजाबमधील पठाणकोठ येथील रूग्णालयात हलविण्यात आले होते. बचावकार्य सुरू पुर्ण होईपर्यंत मृतांची संख्या वाढू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले होते, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.