रिऍलिटी शो आणि वाद हे तसे नेहमीचंच. लोक चवीचवीने बघतात म्हणून दाखवणारे दाखवतात, इतकं साधं सोपं समीकरण. काही प्रसंगी तर टीआरपी वाढविण्यासाठी मुद्दाम वादाचं स्क्रिप्टिंग केलं जातं. मुद्दाम काहीतरी विचित्र घडवले जाते. मुलांच्या शोमध्येसुद्धा मोठ्यांच्या थोबाडीत देतील अशी वाक्ये असतात. शेरेबाजी असते. आजही घरात मुलांनी असं काही वाह्यात उच्चारलं तर मोठ्यांच्या भुवया उंचावतील, पण पडद्यावर मात्र सगळं कौतुकाने पाहिलं जातं.
मुळात एकदा शो करायचे ठरवले की त्यातील रिऍलिटी संपते. साधा सेल्फी घ्यायचा म्हटला तरी आपण पोझ देतोच. दुर्दैवाने सध्या पोझ देताना सुंदरतेपेक्षा उन्मादक आकर्षणाकडे आपला जास्तीचा कल असतो. चेहरा कितीही वाकडतिकडा दिसेला तरी चालेल, पण ओठांचा चंबू मात्र व्यवस्थित असावा लागतो. त्या फोटोकडे बघणार्या प्रत्येकाला ’पुढच्याच क्षणी आपल्यालाच चुंबन मिळेल’ असं वाटावं इतका जिवंत दिसावा लागतो. क्युट दिसण्यापेक्षा सेक्सी दिसणं जास्त मानाचं असतं. समाजाची हीच रिऍलिटी टीव्ही, चित्रपट आणि जाहिरातींमधून झळकत असते. वरवर कितीही नैतिकतेचा आव आणला तरी मनातून आपल्यालाही तेच हवं असतं, म्हणूनच वारंवार गदारोळ होऊनसुद्धा पुन्हा पुन्हा तेच ते घडत राहते.
कुठलाही किड्स रिऍलिटी शो बघा, घरी आईवडिलांना आठवड्याभरात मारत नसतील इतक्या मिठ्या ते छोटे स्पर्धक परीक्षकांना मारतात. वय पाच – सहाचे असेल तर पप्प्यांचा पाऊसच पडतो. प्रत्येक सादरीकरणानंतर दोनचार मिनिटांचा तो कार्यक्रमच होऊन बसतो. बरं जे काही घडत असते त्यात उत्स्फूर्तता असती तर भाग वेगळा, इथे सगळं अगदी नेमून दिल्यासारखं यंत्रवत चालत राहतं. मूळ सादरीकरणापेक्षा या बाकी सगळ्या सोपस्कारांना, त्याच त्या लाडेलाडे कमेंटसना जास्त फुटेज दिलं जातं. त्यामुळे शो नृत्याचा असो वा गाण्याचा जे बघायला मिळतं ते सगळं साधारण एकसारखंच असतं. परीक्षकांच्या खुर्चीत बसलेली मंडळी सादरीकरणाबाबत जे काही टेक्निकल भाषेत बोलत असतात ते शेकडा नव्वद टक्के प्रेक्षकांना अगम्यच असते. नुसती नाचगाणी बघायची तर ती तर कुठेही बघायला मिळतात, त्यामुळे प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी ’इमोशनल करणे’ हाच एकमेव पर्याय असतो. एकदा अख्खा कार्यक्रम इमोशनल बेसवर करायचा ठरला कि मग मूळ कला मागे पडते. स्पर्धक कुठून आलाय, त्याच्या घरची परिस्थिती वगैरे कालबाह्य गोष्टी जास्त महत्वाच्या ठरतात.
मुलं प्रतिकूल परिस्थितीत असताना त्यांना संघर्षासाठी साथ देणं समजू शकतो, जडणघडणीच्या काळातच त्यांना ही परिस्थिती कॅश करायला शिकवणे नक्कीच चुकीचं आहे. हा काळ कलेच्या साधनेचा आहे. भविष्याचा पाया आहे हेच मनावर बिबवलं पाहिजे, प्रत्यक्षात मात्र इथे सहानुभूती मिळविण्याचे संस्कार होतात. सहानुभूती किंवा प्रांतिक अस्मितेपोटी केलेल्या मतदानातून तो स्पर्धक कदाचित आजची स्पर्धा जिंकेल, पण त्या धुक्यात त्याचं पुढचं करिअर कायमचं हरवण्याचा धोका जास्त असतो. किंबहुना आजवरच्या अनेक रिऍलिटी शोचे विजेते, शो संपल्यावर पुढे चार सहा महिन्यातच कलाविश्वातून गायब होतात.
लहान वयात चमकलेले काही मोठेपणी अगदीच सुमार वाटतात, याचे कारण अशा शोच्या मानसिकतेत दडलेले आहे. स्वतःला आधुनिक, ओपन माईंडेड सिद्ध करण्यासाठी अशा प्लॅटफॉर्मवर जो काही आटापिटा केला जातो, तो बघण्यासारखा असतो. स्पर्धक – परीक्षकांची केमेस्ट्री दाखविण्यासाठी, परीक्षकांची मुलांप्रती माया दाखविण्यासाठी जे काही जाते ती रिऍलिटी नसून निव्वळ शोबाजी असते. खरे प्रेम, माया ही मिठ्या आणि पप्प्यांच्या पलीकडे असते. दर दहा मिनिटांना ’आय लव्ह यू’ म्हणावं लागतं तिथेच हे कृत्रिम स्नेह अधोरेखित होते. मात्र स्वतःला आधुनिक, मनमोकळे, प्रेमळ आणि बरेच काही सिद्ध करण्यासाठी भलेभले परीक्षक हे सगळे पोरखेळ करताच राहतात. रिऍलिटीचा गंध नसलेला शो रिअल टीआरपी खेचत राहतो. पण या टीआरपीच्या चढाओढीत जेव्हा एखाद्या फेसबुक लाइव्हमधून सत्य उघडं पडते तेव्हा मात्र गदारोळ उडतो. या रिऍलिटी शो मधली मुलं पडद्यावर कितीही स्क्रिप्टेड आधुनिकता दाखवत असली तरी मुळात ती त्यांची पार्श्वभूमी नसते. गावखेड्यातून या मुलांना असल्या दिखाऊ संस्कृतीची फारशी ओळख नसते. म्हणूनच एखादा पॅपॉन एका अकरा वर्षाच्या मुलीचे गालावर चुंबन घेऊ जातो तेव्हा ती सैरभैर होते. स्वतःची सुटका करून घेण्याच्या नादात गालाऐवजी ओठांवरच चुंबन घेतले जाते. भलेही आता गदारोळ झाल्यानंतर ती मुलगी आणि तिचे पालक पॅपॉनचा बचाव करीत असतील, पण त्या क्षणी त्या मुलीच्या चेहर्यावरची अस्वस्थता स्पष्ट दिसते.
पॅपॉनसाठी ते चुंबन सहज, मनमोकळे असेलही पण त्या मुलीसाठी तो धक्काच असतो. शोचा भाग असता तर याचेही रिटेक घेतले गेले असते, पण फेसबुक लाइव्हवर तशी सोय नसते. रिऍलिटी शोची रिऍलिटी त्यामुळे अशी आकस्मिक उघडी पडते. आज ती मुलगी तिचे पालक, स्पर्धेच्या – चॅनलच्या दडपणामुळे कदाचित काही बोलणार नाहीत पण तो ताण – तो कल्चरल शॉक त्या मुलीच्या मनावर कायम राहील. भविष्यात ती या घटनेकडे कशाप्रकारे पाहिलं? हे आत्ताच सांगणं अवघड आहे. पण या स्पर्धांच्या दिखाव्याला भुलणार्यांसाठी हा एक मोठा धडा असेल.
– सृष्टी गुजराथी
मुक्त पत्रकार, लेखिका मुंबई
9867298771