स्टार एंटरप्रायझेस कंपनीच्या महिला मालकास मारहाण

0

चाकण : कंपनीच्या पाठीमागील भिंतीला कामगारांकडून सिमेंट प्लास्टरचे काम करून घेत असताना, खराबवाडी (ता. खेड) येथील शेतीचे अवजारे बनविणार्‍या स्टार एंटरप्रायझेस कंपनीच्या मालकिनीला शिवीगाळ दमदाटी करत, दहशतीचा प्रचंड थरार करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दिघी येथील बापलेकावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मंगळवार(दि.28) रोजी घडली.

मालकिनीसह कामगारांनाही मारहाण
विजया मोहन पाटील (वय.52 वर्षे, रा.प्लॉट नं.6, अनमोल बंग्लो, अथर्वपार्क, आहेरनगर, चिंचवड) यांनी या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गीताराम क्षीरसागर व त्यांचा मुलगा किशोर क्षीरसागर (दोघे रा.दिघी, ता.हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या बापलेकांची नावे आहेत. येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजया पाटील यांची खराबवाडी नजीक वाघजाईनगर (ता.खेड) हद्दीत गट न.357/24 मध्ये स्टार एंटरप्रायझेस या नावाची शेतीची अवजारे बनविणारी कंपनी आहे. या कंपनीच्या पाठीमागील भिंतीचे पंचवीस मार्च रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सिमेंट प्लास्टरचे काम सुरू होते. त्यावेळी क्षीरसागर बापलेक तेथे आले व या ठिकाणी काम करायचे नाही. असे म्हणून त्यांनी दहशतीचा प्रचंड थरार करत हातात आणलेल्या लाकडी दांडक्याने मारहाण केली.

गंभीर दुखापत, उपचार सुरू
या मारहाणीत पाटील यांच्या उजव्या गुडघ्याला गंभीर मार लागला असून, त्यांच्यावर चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किशोर याने सिमेंट प्लास्टरचे काम करणार्‍या कामगारांनाही शिवीगाळ दमदाटी करत त्यांनाही बेदम मारहाण केली. विजया पाटील यांनी चाकण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून क्षीरसागर बापलेकावर भादंवि कलम 323, 324, 504, 506 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संतोष गिरीसोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दत्तात्रय जाधव, नामदेव जाधव व सहकारी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.