क्वालालंपूर । भारताचा स्टार बॅडमिंटनपटू अजय जयरामने आगेकूच कायम ठेवताना मलेशियन ओपन सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी झालेल्या दुसऱया फेरीतील लढतीत त्याने जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानी असलेल्या डेन्मार्कच्या ऍक्सलसेनला पराभवाचा धक्का दिला. महिला गटात भारताच्या सायना नेहवाल, पीव्ही सिंधू यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले आहे.
पहिल्या गेममध्ये व्हिक्टरने आक्रमक प्रारंभ करताना जयरामला बॅकफूटवर ढकलले होते. हा गेम त्याने 21-9 असा जिंकत आघाडी घेतली होती. पण, दुसऱया गेममध्ये मात्र जयरामने जोरदार पुनरागमन करताना हा गेम 21-14 असा जिंकत 1-1 अशी बरोबरी साधली. यानंतर, तिसऱया गेममध्येही हाच धडाका कायम ठेवताना जयरामने 21-19 असा जिंकत उपांत्यपूर्व फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. तिसऱया गेममध्ये व्हिक्टरने 14-14, 16-16 अशी बरोबरी होती. पण, जोरदार स्मॅशेसच्या जोरावर जयरामने हा गेम 21-19 असा जिंकला. याआधी उभयतात चार लढती झाल्या असून चारही लढतीत व्हिक्टरने बाजी मारली होती.
गुरुवारी झालेल्या दुसऱया फेरीतील लढतीत जयरामसमोर अलीकडेच इंडिया ओपन सुपरसिरीजचे जेतेपद मिळविलेल्या डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सलसेनचे आव्हान होते. पण, बलाढय ऍक्सलसेनला जयरामने 9-21, 21-14, 21-19 असे पराभूत करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ही लढत तब्बल 68 मिनिटे चालली. आता उपांत्यपूर्व फेरीत जयरामसमोर दक्षिण कोरियाच्या सोन वान होचे आव्हान असेल.