जळगाव । नगरसेविका अश्विनी देशमुख व विनोद देशमुख यांनी रविवार 9 जुलै रोजी पत्रकार परिषद घेवून वार्ड क्र. 36 मध्ये साफसफाई मक्तेदार सफाई व्यवस्थित करीत नसल्याची तक्रार करत मनपाचे अधिकारी व मक्तेदार पैसे खात असल्याचा आरोप केला होता. वार्डातील नगरसेविका आश्विनी देशमुख यांनी राजकीय दबाव वापरुन हा ठेका रद्द केल्याचा आरोप सहजीवन स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. याप्रसंगी सचिव गोपाल लाठी, सदस्य रमेश चौधरी, मिलींद चौधरी, धनराज चौधरी, उमेश गवळी, विनोद मराठे आदी उपस्थित होते.
पीएफ बील पास करणार्यांवर गुन्हा दाखल करा
महापालिकेने शहराची साफसफाई करण्यासाठी शहरातील काही वार्डांमध्ये स्वच्छतेचे ठेके दिलेले आहे. तर याच वार्ड क्र. 36 व 29 मध्ये 2014-15 साली ठेका विनोद देशमुख यांचे सहकारी चालवित असल्याने या कालावधीत तत्कालीन नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी एकही तक्रार केलेली नाही. तसेच या ठेकेदारांनी मजुरांचा भविष्य निर्वाहनिधी जमा केलेला नाही. तसेच कर्मचार्यांचे पीएफ देखील महापालिकेत जमा केलेले नाही. तरी देखील या ठेकेदारांचे बिले पास झालेच कसे असा प्रश्न श्री. पाटील यांनी उपस्थित केला. यासोबतच त्यांची ही बीले पास करणार्यांवर प्रशासनाने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी श्री. पाटील यांनी केली.
मजूरांच्या हजेरीपुस्तकात फेरफार
नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी सांगीतले की शहरातील सफाईंचे ठेके हे 60 हजारात चालतात. परंतू महापालिका प्रशासनाने हे ठेके 3 लाख 40 हजारात दिलेले असून ठेकेदारांचा फायदा होत असेल मनपाने साफसफाईसाठी देण्यात आलेले ठेके देशमुख यांनी घेवून शहरातील साफसफाई करावी. तसेच ठेकेदारांनी देखील आपल्या ठेक्याचे काम श्री. देशमुख यांना एक लाख रुपये देवून शहराची साफसफाई करुन घ्यावी असे आवाहन किरण पाटील यांनी श्री. देशमुख यांना दिले. नगरसेविका आश्विनी देशमुख यांच्या सहकार्यांच्या सन 2014-2015 मध्ये याच प्रभागातील ठेका होता. यावेळी ठेकेदार मिलींद सोनवणे व रुपेश ठाकूर या दोन ठेकेदारांकडून आपल्या वार्डाची साफसफाई एकाच मजूरांकडून केली जायची. तसेच मजूरांची दोघ वार्डात हजेरीपुस्तकांवर या कामागारांच्या नावाची नोंदणी सारखी असल्याचे पुरावे नितीन सपके यांनी पत्रकार परिषदेत सादर केले आहे.
व्हिडीओमध्ये काटछाट केली
नगरसेविका आश्विनी देखमुख यांनी स्टिंग ऑपरेशनात कमिशन वाढवून देण्याचा आरोप नगरसेविका ज्योती चव्हाण त्यांचे पती बाळासाहेब चव्हाण व आरोग्यधिकार्यांवर केला होता. परंतू तयार करण्यात आलेला हा व्हिडिओ काटछाट करुन त्यामधले संभाषण कापून हा त्यांच्या सोयीनुसार तयार करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे नगरसेविका महिला असल्याचा फायदा घेत व आरोग्यधिकार्यांना धमकी देत संबंधित ठेकेदारांना दंड करायला लावण्यास भाग पाडत असल्याचे त्यांनी सांगीतले. दरम्यान, प्रभाग क्रमांक 36 मध्ये दैनंदिन साफसफाई होत नसल्याच्या कारणावरुन आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. तक्रारीचा चौकशी अहवाल अद्याप आलेला नसतांना प्रभारी आयुक्तांनी राजकीय दबावापोटी ठेका रद्द केला असल्याचा आरोप किरण पाटील यांनी केला.