स्टील कारखान्यातील स्फोटात सात जखमी

0

यवत । दौंड तालुक्यातील भांडगाव येथे भांडगाव-खोर रोडला असलेल्या मिनाक्षी फायरी इनगार्ड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये बुधवारी सकाळी झालेल्या स्फोटात सात परप्रांतीय कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यामध्ये दोन कामगारांची प्रकृती गंभीर आहे. संतोष कुमार, रमेश पाल, रामप्रसाद ताटी, अबुजार कलीम खान अशी जखमींची नावे असून तीन कामगारांची नावे अद्याप समजू शकलेली नाही. पाच कामगारांना लोणी काळभोर येथील विश्‍वराज हॉस्पिटलमध्ये तर दोघांना केडगाव-चौफुला येथील साईदर्शन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अँगल तयार करण्यासाठी लोखंड वितळवून बकेटमधून क्रेनच्या सहाय्याने वाहून नेले जात असताना क्रेन तुटली. या क्रेनमधील बकेट लोखंड वितळणार्‍या भट्टीत पडल्याने मोठा स्फोट झाला. यावेळी तेथे कामगार जखमी झाले. या स्फोटामुळे कंपनीला आग लागली. दोन तासानंतर आग आटोक्यात आणण्यास अग्निशमनदलाच्या जवानांना यश आले. या स्फोटाची तीव्रता दोन ते तीन किलोमीटरपर्यंत जाणवली. कंपनी व्यवस्थापनाने याबाबत कळविले नव्हते. तीन तासानंतर ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.