स्टीव्ह स्मिथच्या कसोटीत 5000 धावा

0

रांची ।भारत विरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पार करुन विक्रमाची नोंद केली. रांची येथे सुरु असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथने शानदार शतकी खेळी केली. स्मिथने 53 व्या कसोटीत 97 डावात 5000 धावा पूर्ण केल्या. स्टीव्ह स्मिथला 5000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 76 धावांची गरज होती. या सामन्यात पूर्ण करत त्याने 361 चेंडूत 17 चौकांरासह नाबाद 178 धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियन कर्णधार म्हणून स्टीव्हन स्मिथची भारताविरुद्ध 5 कसोटी शतके झाली आहेत. भारताविरुद्ध कर्णधार म्हणून सर्वाधिक 7 शतके ठोकण्याचा विक्रम विंडीजच्या क्लाइव्ह लॉइड यांच्या नावे आहे. 5000 धावांचा टप्पा गाठताना सर्वाधिक शतके ठोकणार्‍यांत स्मिथ (19 शतके) चौथ्या क्रमांकावर आहे. ब्रॅडमन (21 शतके), सुनील गावसकर आणि मॅथ्यू हेडन (प्रत्येकी 20 शतके) हे स्मिथच्या पुढे आहेत.

स्मिथ सातव्या क्रमांकावर
जागतिक क्रमवारीत कसोटी सामन्यात 5000 धावा करणा-या फलंदाजांच्या यादीत स्टीव्ह स्मिथ सातव्या क्रमांकावर पोहचला आहे. याचबरोबर सर्वाधिक जलद धावा करणा-या ऑस्ट्रेलियातील फलंदाजांच्या यादीत स्टीव्ह स्मिथ चौथ्या स्थानावर आहे. स्मिथने 53 व्या सामन्यात 5000 धावा पूर्ण केल्या. याआधी डॉन ब्रॅडमन यांनी 36 तर सुनील गावसकर यांनी 52 कसोटींत ही कामगिरी केली.

रेनशॉच्या 500 धावा पूर्ण
रेनशॉ कसोटीत 500 धावा पूर्ण करणारा सर्वात तरुण ऑस्ट्रेलियन ठरला. त्याने ही कामगिरी वयाच्या 20 वर्षे 353 व्या दिवशी केली. ऑस्ट्रेलियाचा हा 800 वा कसोटी सामना आहे. त्यांच्यापेक्षा जास्त कसोटी सामने फक्त इंग्लंडने (983) खेळले आहेत.