‘स्टॅन्ड अप इंडियां’तर्गत उद्योग उभारणीवर भर द्या

0

बोदवड : प्रत्येक व्यक्तिने मनात आणले तर उद्योजक बनू शकतो. उद्योजक बनण्याचा प्रत्येकाचा उद्देश असला पाहिजे. यामुळे नुसता रोजगारच मिळत नाही तर इतरांनादेखील रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. त्यामुळे रोजगार निर्मितीवर भर देण्याचे आवाहन स्टेट बँकेचे एजीएम अशोककुमार गुप्ता यांनी केले. तालुक्यातील ऐनगाव येथे भारत दालमिलचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक व अध्यक्षीय भाषणात गुप्ता बोलत होते.

उद्योगासाठी 10 लाख ते 1 कोटींचे कर्ज
ते पुढे म्हणाले की, स्टेट बँकेकडून एससी, एसटी बेरोजगारांना लघु उद्योगासाठी 10 लाख ते 1 कोटी रुपयापर्यंत केंद्र सरकारच्या स्टॅन्ड अप इंडिया योजनेंतर्गत कर्ज देण्यात येते. त्यामुळे याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक मिलचे संचालक संतोष निकम यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी अभियंता कमलाकर सुरवाडे, जळगाव स्टेट बँकेचे व्यवस्थापक विशाल इंगळे, पोलीस उपनिरीक्षक पूनम तायडे, गौतम बराडिया, दुय्यम निबंधक डी.एम. घोडके, सरपंच अन्नपुर्णा कोळी, उपसरपंच अनिता तळेले, मुख्याध्यापक बी.जे. इंगळे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी के.एस. सुरवाडे, बहुजन समाज पार्टीचे रविंद्र गवई यांसह गावातील नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार पुरुषोत्तम गड्डम यांनी केले.