मुंबई – हृदय शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या स्टेन्ट, कॅथेटर, बलुन्स यांच्या अवाजवी किमती आकारल्याबद्दल मुंबईतल्या आठ मोठमोठ्या रूग्णालयांविरूद्ध खटले दाखल करण्यात आल्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी गुरूवारी विधान परिषदेत सांगितले.
संजय दत्त यांनी मांडलेल्या एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. लीलावती, एशियन हार्ट, फोर्टिस, कोकीळाबेन अंबानी, ग्लोबल, हिरानंदानी व सर एच. एन. (रिलायन्स फाऊंडेशन) या रूग्णालयांवर हे खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यांना ही इउपकरणे पुरवणाऱ्या कंपन्यांनाही नोटिसा बजाविण्यात आल्याचे बापट यांनी सांगितले.
कोकणासाठी केंद्राकडे
डॉ. कस्तुरीरंगन समितीनं दिलेल्या अहवालामुळे पश्चिम घाटातील विशेषतः कोकणातला बहुतांशी भाग इको सेसेंटीव्ह झोन म्हणून जाहीर झाला आहे. यामुळे रोहा, नागोठणे अशा एकूण १३ औद्योगिक वसहतीमधल्या अनेक उद्योगांना फटका बसला आहे. त्यामुळे जेव्हढा भाग प्रत्यक्षात या झोनमध्ये येतो तेव्हढा भाग सोडून बाकीचे क्षेत्र या झोनमधून वगळावे अशी विनंती शासन केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याला करणार आहे. यासाठी आपण ३० दिवसांत केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. जयदेव गायकवाड यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.
सातवा वेतन आयोग लवकरच
राज्य सरकारी कर्मचार्यां ना सातवा वेतन आयोग लवकर लागू करणार आहे. त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्याचे माजी सचिव के. पी. बक्षी यांची समिती कार्यरत आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्याने राज्यावर २१ हजार ५०० कोटी रूपयांचा भार येणार आहे. कर्मचार्यांीना दिली जाणारी वाढ साधारण २२ ते २५ टक्के आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. कपिल पाटील यांनी यासंबंधीची लक्षवेधी सूचना मांडली होती.
ठाण्याच्या शासकीय रूग्णालयाची पुनर्बांधणी
प्रश्नोत्तराच्या तासात आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येत्या पावसाळ्यानंतर ठाण्याच्या शासकीय रूग्णालयाची पुनर्बांधणी करण्यात येईल, असे जाहीर केले. निरंजन डावखरे यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. पावसाळ्यानंतर त्यातल्या रूग्णांना राज्य कामगार विमा रूग्णालयात तात्पुरते हलवले जाईल. नवे रूग्णालय ५७० खाटांचे असेल आणि ते अडीच वर्षांत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.