भुसावळ। शे तकरी वर्गाला, महिला व जेष्ठ नागरिकांना शासनातर्फे विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना शालेय अनुदान मिळनेसाठी बँक खाते आवश्यक असते. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे ग्राहकांच्या सोयीसाठी शहरात स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध करुन दिलेले आहे. परंतु या केंद्रामार्फत मागील चार महिन्यापासून 700 पेक्षा जास्त शेतकरी, महिला, विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांचे नविन खाते तयार करण्यासाठी अर्ज भरण्यात आलेले होते. मात्र ते रद्द केल्यामुळे या खातेधारकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शहर शिवसेनेतर्फे बँक व्यवस्थापकांना बुधवार 31 रोजी निवेदन देण्यात आले. शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली भगवा सप्ताह दरम्यान परिसरातील शेतकरी, महिला, विद्यार्थी व जेष्ठ नागरिक यांच्या नविन खाते रद्द केल्यामुळे भुसावळ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखा प्रबंधक प्रताप सिंह गिरासे यांना निवेदनाद्वारे ग्राहकांच्या व्यथा मांडण्यात आल्या.
विनापावती घेतले जातात पैसे
ग्राहक सेवा केंद्राकडून 300 रुपये विना पावती आकारले जात असून यापैकी फक्त 100 रुपये नविन खात्यात जमा केले जातात. 180 रुपये विनाकारण आकारले जात आहे अशी तक्रार प्रा. धिरज पाटील यांनी केली आहे. नविन खाते तयार करण्यासाठी कोणत्याही ग्राहकाने अतिरिक्त रक्कम देवू नये तसेच दिलेल्या रक्कमेची पावती घ्यावी. निर्धारित रक्कमेपेक्षा ग्राहक सेवा केंद्राकडून रक्कम मागितल्यास शिवसेना कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी केलेले आहे.
2 दिवसात प्रकरणे मार्गी लागणार
शहरात अनेक ठिकाणी अवैध पद्धतीने मुद्रा लोन देण्यात आलेले असून त्याबद्दल सविस्तर चौकशी करण्यात यावी तसेच योग्य व्यक्तीलाच मुद्रा लोन मिळावे अशी मागणी अजय पाटील यांनी केली आहे. भुसावळ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखा प्रबंधक प्रतापसिंह गिरासे यांनी यासंबंधी पुढील चौकशीचे आदेश दिलेले असून सर्व प्रकरणे पुढील दोन दिवसामध्ये मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन दिले आहे. अतिरिक्त रक्कम घेण्यात आलेली असून ग्राहकांनी सेवा केंद्रातुन रितसर पद्धतीने परत करण्याचे आदेश दिले आहे. प्रा.धिरज पाटील, प्राचार्य विनोद गायकवाड, वाहतुक सेनेचे रफीक खान, अबरार खान, जेष्ठ शिवसैनिक अबरार शेख, अजय पाटील, देवेंद्र पाटील, सुरेंद्र सोनवणे, युवा सेनेचे मिलिंद कापडे, सोनी ठाकुर, योगेश सोनार, अमोल पाटील, शिवसेना व युवासेना, शिव वाहतूक सेना, शिक्षक सेना, रेल कामगार सेना पदाधिकार्यांनी सहभाग नोंदवाला.
नोंदणी योग्य करावी
तसेच सर्व कागद पत्रांची पुर्तता केल्यावर सुद्धा 700 पेक्षा जास्त शेतकरी, महिला, विद्यार्थी व जेष्ठ नागरिक यांचे नविन खाते कोणतेही कारण न देता रद्द करण्यात आले आहे. या सर्व ग्राहकांच्या वारंवार फेर्या या बालाजी सर्व्हिसेस भुसावळ या ग्राहक सेवा केंद्रात वाढल्या आहे. त्यामुळे ग्राहकांच्या सुविधेसाठी असलेली हि सेवा केंद्रे ग्राहकांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यादृष्टीने बँक प्रशासनाने या केंद्र चालकांना सुचना देण्यात येऊन खाते धारकांची नोंदणी योग्य पध्दतीने करण्याची आवश्यकता आहे.