नवी दिल्ली : स्टेट बँकेने गृह कर्जाचा व्याज दर पाव टक्क्याने (0.25 टक्के) कमी केला आहे. 30 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज घेणार्यांना सुमारे 0.10 टक्क्यांपर्यंत या कपातीचा फायदा होईल. हा नवा व्याजदर लागू झाला आहे. स्टेट बँकेपाठोपाठ अन्य बँकाही गृह कर्जावरील व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे. या दर कपात योजनेतील नवा वार्षिक 8.35 टक्के व्याजदर हा 31 जुलैपर्यंतच असेल. जागतिक मंदी, गृहकर्जाचे वाढलेले व्याजदर, नोटाबंदी यामुळे बांधकाम क्षेत्र अजूनही मंदीत अडकले आहे. यामुळे काही मोठ्या शहरांमधील नव्याने बांधलेल्या निवासी संकुलातील असंख्य फ्लॅट विक्रिअभावी आजही पडून आहेत. मात्र बँकांनी गृह कर्जाचे व्याजदर कमी केल्यास या क्षेत्रात सकारात्मक वातावरण तयार होऊ शकते. सध्या स्टेट बँकेने अशाप्रकारचे पाऊल उचलले असून अन्य बँकाही व्याजदरात लवकरच कपात करू शकतात.