स्टेट बँक करतेय ग्राहकांची लुट

0

जळगाव । भारतीय स्टेट बँक ही देशातील एक अग्रणी व मोठे भांडवल असलेली बँक आहे. देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँकेकडे पाहिले जाते. राष्ट्रीयकृत बँक असल्याने या बँकवर ग्राहकांचा विशेष विश्‍वास आहे. मात्र काही दिवसांपासून स्टेट बँकेकडून ग्राहकांची फसवणुक केली जात आहे. बँक ग्राहाकांना मोठ्या प्रमाणात सेवा शुल्क आकारते आहे.

मात्र सेवा पुरविण्यात बँक अपुरी पडत आहे. स्टेट बँकेच्या नियमावलीत केलेले बदल सध्या ग्राहाकांसाठी डोके दुखी ठरत आहे. तसेच बँकेचे कर्मचारी योग्य रित्या मार्गदर्शन करत नसल्याने आणि कामाचा टाळाटाळ करत असल्याने ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. नोटाबंदीनंतर बँकेचे व्यवहार करण्यात ग्राहकांना अधिकच अडचण येत आहे.

ग्राहकसेवा केंद्राकडून फसवणूक
ग्राहक सेवा केंद्र चालक पैसे भरण्यासाठी येणार्‍या ग्राहकांकडून भरणा पावती भरुन रोकड ठेवून घेतात. थोड्या वेळात पैसे खात्यावर जमा होतील असे सांगतात मात्र मात्र कधी कधी आठवडाभरही संबंधीत खातेदारांच्या खात्यात पैसे जमा केले जात नाही. तसेच ग्राहकांची ही रक्कम ग्राहक सेवा केंद्र चालक वापरतात असे उत्तर प्रदेशातील काही कामगारांनी सांगितले आहे.

दहा हजाराखालील रक्कम घेत नाही
काही स्टेट बँकेच्या शाखेत दहा हजाराच्या खालील रोकड भरणा घेतली जात नसल्याचे दिसून आले आहे. बँक अधिकारी सरळ ग्राहक सेवा केंद्रात ही रक्कम भरा असे सांगतात. ग्राहक सेवा केंद्रात दहा हजाराच्या व्यवहारामागे शंभर रुपये सेवा शुल्क घेतले जाते. त्यामुळे सामान्य ग्राहकांना विनाकारण सेवा शुल्काचा भुर्दंड बसत आहे. बँकेचे अधिकारी आणि ग्राहक सेवा केंद्र चालक यांच्यात काही साटेलोट असल्याचे ग्राहक सांगतात.

एटीएम बंदच असतातफ
स्टेट बँकेने दुसर्‍या बँकेच्या एटीएमद्वारे तीन पेक्षा जास्त वेळेस पैसे काढल्यास शुल्क आकारते. मात्र शहरातील स्टेट बँकेचे बहुतांश एटीएम नेहमीच बंद अवस्थेत असतात. त्यामुळे पर्यायाने स्टेट बँकेच्या ग्राहकांना दुसर्‍या बँकेच्या एटीएममधुन पैसे काढावे लागतात त्याचा भुर्दंड हा ग्राहाकंवर पडत असतो. बँकेच्या चुकीच्या धोरणाचा फटका ग्राहकांना बसत असल्याचे दिसून येते आहे.

मी पंधराशे रुपये परीक्षा शुल्क ऑनलाईन अदा केले होते. तेव्हा माझ्या खात्यातुन तेवढे पैसे कमी झाले मात्र परीक्षा शुल्क अदा करण्यात आली नाही. ती रक्कम 45 दिवसानंतर माझ्या खात्यात जमा झाली. त्यामुळे मात्र मी परीक्षेपासून मुकलो. दुसर्‍यांदा मी ग्राहक सेवा केंद्राद्वारे दहा हजार रुपयाचा भरणा केला. भरणा यशस्वी झाल्याचे दाखवत आहे मात्र खात्यात रक्कम दिसत नाही बँकेच्या चुकीच्या कारभाराचा मला दोन वेळा फटका बसलेला आहे. – संजय चव्हाण