जळगाव । तालुक्यातील कानळदा गावी स्टेट बँकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली. बँकेतील सहकार्यांनी त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना तपासणीअंती मयत घोषित केले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील चंदुअण्णा नगरातील रहिवाशी असलेले दिपक लक्ष्मण कुळकर्णी वय 57 हे कानळदा येथील स्टेट बँकेत वरिष्ठ रोखपाल म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. त्यातच ते औरंगाबाद येथून ट्रेनिंग करून आजच पुन्हा कामावर हजर झाले होते. दरम्यान सकाळपासून त्यांची तब्येत ठिक नव्हती. दुपारी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी बँकेतील कर्मचारी संजय राणे याला पाणी पिण्यासाठी मागितले. पाणी पिल्यानंतर अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. कुळकर्णी खुर्चीवरच पडून असल्याने कर्मचारी राणे याने बँकेतील इतर कर्मचार्यांना माहिती दिली. व त्यांना तात्काळ शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणच्या डॉक्टरांनी त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. कुळकर्णी यांना शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले. कुळकर्णी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.