दहिगावच्या खातेदाराचे एटीएम घेऊन भामटा चर्तुभुज
यावल- यावल स्टेट बँकेच्या ए. टी. एम. मधून तालुक्यातील दहीगाव येथील इसम स्वत:च्या खात्यातून पैसे काढत असतांना ते निघत नसल्याने मागे उभ्या असलेल्या एका भामट्याने मदतीच्या नावाखाली एटीएम बदलून तेथून पोबारा केल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. मात्र खातेदाराच्या लक्षात ही बाब लगेच आल्याने त्यांनी तत्काळ बँकेत जावून व्यवस्थापकांना भेटले असता व्यवस्थापकांनी तत्काळ एटीएम कार्ड बंद केल्याने सदर इसमाचे तीन लाख रुपये वाचले.
मशीनमध्ये पैसे नसल्याचे सांगून पोबारा
स्टेट बँकेच्या एटीएममधून दहीगावचे उत्तम शिवराम महाजन हे पैसे काढत असतांना त्यांच्या मागे एका 35 वर्षीय वयोगटातील दाढीवाला इसम येवून उभा राहिला व महाजन यांच्या एटीएमच्या पिनकडे लक्ष ठेवले पैसे न निघाल्याने त्या भामट्याने तुम्हास मदत करतो, असे सांगून त्याच एटीएम कक्षातील दुसर्या मशिनकडे वळतांना हातचलाखीने स्वत:जवळचे सीताराम भील नामक व्यक्तीचे एटीएम कार्ड महाजन यांच्या कार्डाशी अदल बदल केले व या मशिनमध्ये देखील पैसे नाही असे सांगत तेथून पोबारा केला. तेव्हा महाजन यांना एटीएम कार्ड पाहून शंका आली व हे तर आपले कार्ड नाही हेे कळाले व ते पोलीस ठाण्याकडे येवु लागले तेव्हा त्यांच्याच गावातील ए.टी.चौधरी हेे त्यांना दिसले चौधरीसह गावचे तलाठी विलास नागरे, मंडळ अधिकारी तुषार घासकडबी यांना त्यांनी घडलेला प्रकार सांगितला व ए.टी. चौधरी यांनी महाजन यांना सोबत घेत तत्काळ स्टेट बँक गाठली तेथे शाखा व्यवस्थापक एफ.आर.डीक्रूज यांना ही बाब सांगितली व महाजन यांचे कार्ड ब्लॉक करण्यात आले. महाजन यांच्या बँक खात्यात एकूण तीन लाख 10 हजार 145 रुपये होते व बँक बंद झाल्यानंतर हा प्रकार घडला या प्रकाराचे गांभीर्य ए.टी.चौधरी यांनी जाणले व बँकेच्या सुरक्षा रक्षकास विनंती करून बँकेत प्रवेश करीत व्यवस्थापकांना हा प्रकार सांगितला अन्यथा महाजन यांना संपुर्ण पैशांना मुकावे लागले असते.