मुंबई । देशात जीएसटी लागू झाल्यावर काही वस्तू स्वस्तात मिळतील, तर काही महागणार आहेत. पण या जीएसटीमुळे आयपीएलचे सामने थेट स्टेडियममध्ये जाऊन बघण्यासाठी क्रिकेटप्रेमींना आता विचार करावा लागणार आहे. क्रिकेट आणि मनोरंजन यांची सांगड असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगचा सरकारने चैनीच्या गोष्टींमध्ये समावेश करण्यात आला आहे.
त्यामुळे सामान्य क्रिकेटप्रेमींना आयपीएलच्या एका तिकिटासाठी 28 टक्के कर भरावा लागणार आहे. मात्र, इतर खेळांच्या संघटना यात थोडी सुट मिळाली असून आयपीएलवगळून होणारे इतर प्रारूपातील क्रिकेट सामने आणि हॉकी सामन्यांच्या तिकिटावर 18 टक्के कर आकारण्यात येणार आहे. यात 250 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या तिकिटांवर मात्र कुठलाही कर लावण्यात आलेला नाही. पण कमी किमतीची मोजकीच तिकीटे स्टेडियममध्ये विक्रीस ठेवली जात असल्यामुळे यापुढे सामान्य क्रीडाप्रेमींची तिकीट मिळवण्यासाठी आणखीच गोची होणार आहे.
10 टक्क्यांनी कर कमी
याआधी क्रिकेटसह सगळ्याच खेळांच्या स्पर्धांवर 28 टक्के कर आकारण्याचे ठरले होते. पण गुरुवारी झालेल्या बैठकीत मात्र हा कर 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर आणण्यात आला. आयपीएलच्या तिकिटांवर याआधीही सेवा आणि मनोरंजन कर आकारला जात होता. पण आता सर्वच प्रकारच्या क्रीडा सामन्यांच्या तिकिटावर कर घेणार असल्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी आहे.