पुणे । कामाच्या शोधात पुण्यात आलेल्या एका जोडप्याचे आठ महिन्याचे बाळ अनोळखी महिलेने पुणे स्टेशन परिसरातून पळवून नेले. ही घटना सोमवारी (दि.5) रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान बाळाला पळवून नेल्याचे कळताच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित महिलेचा शोध सुरू केला असून मुलीच्या शोधासाठी पोलिसाची चार पथके तयार करण्यात आली आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अक्कलकोट येथून हे पीडित कुटूंब 3 फेब्रुवारी रोजी कामाच्या शोधात पुण्यात आले होते. त्यांनी 4 फेब्रुवारी रोजी हडपसर परिसरात एका केटरर्सकडे काम केले. त्यांनतर राहण्यासाठी निवारा नसल्यामुळे त्यांनी रेल्वे स्टेशन परिसरातील दर्ग्याजवळ मुक्काम केला. सोमवारी रात्रीही ते दर्ग्याजवळ थांबले असताना तिथे एक महिला आली आणि तिने या दाम्पत्यांशी जवळीक वाढवली.त्याच दिवशी तिने रात्रीच्या वेळी या दाम्पत्याला मी मुलीला सांभाळते, तुम्ही जेवण करून या असे सांगितले. त्यांनीही तिच्यावर विश्वास ठेवला आणि ते जेवायला गेले. थोड्यावेळाने ते जेवून परत आले असता ती बाई व मुलगी जागेवर नव्हती. स्टेशन परिसरात सर्वत्र शोध घेतल्यानंतरही दोघेही कोठेच न सापडल्याने त्यांनी रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली.रेल्वे पोलिसांनी स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता ती महिला भुयारी मार्गातून मुलीला घेवून जाताना दिसली. पोलिसांनी मुलीची सुटका करण्यासाठी चार स्वतंत्र पथके तयार केली असून शोध सुरू आहे.