गणेशोत्सव काही दिवसांवर असतानाही गणेशमूर्ती विक्रीविना कारखान्यात, गणेश मूर्तिकारांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होणार
ठाणे – गणेशोत्सव अवघ्या दोन ते तीन दिवसांवर येऊन ठेपला असतानाही ठाण्यातील बहुतांश गणेश कारखान्यांतील गणेशमूर्ती विक्रीविना पडून आहेत. त्याला मुख्यत: स्टॉलधारक जबाबदार असल्याचे जुन्या गणेश मूर्तिकारांचे म्हणणे आहे. ठाण्यातील बड्या गणेश कारखान्यांत प्रत्येकी हजारांहून अधिक गणेशमूर्ती विक्रीविना पडून असल्यामुळे गणेश मूर्तिकार चिंतित आहेत. वाढत्या स्टॉलधारकांवर वेळीच न रोखल्यास उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न भविष्यात निर्माण होण्याची शक्यताही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
कलेला किंमत नाही
गेल्या काही वर्षांत ठाणे शहरात गणेश मूर्तिकारांच्या स्टॉलधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विविध ठिकाणांहून गणेशमूर्ती खरेदी करून त्या ठाण्यात आणून मिळेल त्या किमतीला विकल्या जात आहेत. केवळ कलेवर पोट असणार्या कलाकारांचे भवितव्य देशाधडीला लागण्याची शक्यता आहे. आज कलेला किंमत नसून केवळ कमी किमतीतील गणेशमूर्ती खरेदी करण्याकडेच ग्राहकांचा कल असल्याचे मूर्तिकार अरुण बोरीटकर यांनी सांगितले. मूर्तिकारांची खरी ओळख गणेशमूर्तीची आखणी, त्यांची देहबोली आणि एकूणच रचनेवर आधारित असते. मात्र, महागाईमुळे ग्राहकही गणेशमूर्तींच्या रंगरंगोटी न पाहता केवळ कमी किंमत म्हणून स्टॉलधारकांकडून गणेशमूर्ती खरेदी करत आहेत.
गणेश मूर्तिकारांमध्ये स्पर्धाही वाढली
गेल्या काही वर्षांत ठाणे शहरात गणेश मूर्तिकारांमध्ये स्पर्धाही वाढली आहे. ठाणे शहरात याआधी बड्या गणेशमूर्ती कारखान्यांची संख्या केवळ 12 ते 15 होती. मात्र, आता हा आकडा 25 च्या घरात गेला आहे. त्यात आता स्टॉलधारकांची भर पडली आहे. त्यामुळे वाढत्या गणेशमूर्ती कारखान्यांमुळे निश्चितच स्पर्धाही वाढली आहे. वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आता जुन्या गणेश मूर्तिकारांना कठीण होत असताना त्यात त्यांची मुलांनीही या व्यवसायाकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी, राज्य सरकारने गणेश मूर्तिकारांसाठी कायमस्वरूपी पेन्शन योजना सुरू करावी, अशी मागणी आता गणेश मूर्तिकारांकडून जोर धरू लागली आहे.
कामगारांच्या पगाराचा प्रश्नही कायम
आम्ही गणेशमूर्ती कारखाने बाराही महिनेही चालवतो. त्यामुळे कामगार बाराही महिने कारखान्यांत काम करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत गणेेशमूर्तीच्या तुलनेत भाविकांची संख्याच रोडावली आहे. त्यासाठी स्टॉलधारक जबाबदार आहेत. परिणामी, कामगारांचा पगारही प्रश्न सुटत नसल्याची व्यथा मूर्तिकार अरुण बोरीटकर यांनी मांडली. महागाईमुळे साहजिकच गणेशमूर्तीच्या किमतीतही वाढ झाली आहे. मात्र ग्राहक गणेशमूर्तीच्या किमती वाढविल्यास स्टॉलधारकांचा मार्ग अवलंबतात. त्यामुळे बहुतांश ग्राहक आजही कारखान्यांकडून स्टॉलधारकांकडून वळवला आहे.
ठाण्यात गणेशमूर्ती कारखान्यांच्या तुलनेत स्टॉलधारकांची संख्या वाढली
ठाणे शहराची लोकसंख्या आजच्या घडीला 24 लाखांच्या आसपास आहे. त्या तुलनेत ठाण्यातील लहान-मोठे अशा गणेश कारखान्यांची संख्या फारच कमी आहे. लोकसंख्येच्या तुलनेत कारखान्यांची संख्या कमी असतानाही स्टॉलधारक मात्र वाढले आहेत. त्याचाच परिणाम गणेशमूर्ती विक्रीवर झाल्याचे सिद्धेश गणेश कला मंदिर कार्यशाळेचे मालक, मूर्तिकार अरुण महादेव बोरीटकर यांनी मान्य केले. गेल्या वर्षीपेक्षा यंदा बहुतांश गणेशमूर्ती विक्रीविना पडून आहेत. त्याला सर्वस्वी स्टॉलधारक जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आजच्या घडीला 500 हून अधिक गणेशमूर्ती विक्रीविना पडून असल्यामुळे आमच्यावर अन्याय होत असल्याची व्यथाही त्यांनी मांडली तसेच ठाण्यातील विविध गणेशमूर्ती कारखान्यांतील सुमारे 5 हजारांहून अधिक गणेशमूर्तीची विक्री आजही झालेली नाही. त्यामुळे गणेश मूर्तिकारांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. त्यासाठी ठाणे महानगरपालिकेने लक्ष घालून बेकायदा स्टॉलधारकांना परवानगी देऊ नये, जेणेकरून जुन्या आणि कलेची जाण असणार्या गणेश मूर्तिकारांना न्याय मिळेल, अशी कळकळीची विनंतीही बोरीटकर यांनी केली.
- बुकिंग गणेशमूर्ती विक्रीविना
गेल्या वर्षी ठाण्यातील वर्तकनगर परिसरात एका स्टॉलधारकांनी कोल्हापूर येथून गणेशमूर्ती विक्रीसाठी आणल्या होत्या.या गणेशमूर्ती या स्टॉलधारकांनी अवघ्या 100 ते 150 रुपयांना विकल्या होत्या. त्यामुळे वर्तकनगर भागातील गणेश कारखान्यांत ग्राहकांनी बुकिंग केलेल्या गणेशमूर्तीकडेच पाठ फिरवली.
100 ते 150 रुपयांत मिळणार्या या गणेशमूर्ती खरेदी करुन त्यांनी मूळ गणेश कारखान्यांकडे जाणे टाळले.
त्यामुळे या कारखान्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले तसेच बुकिंग केलेल्या गणेशमूर्तीही कारखान्यांत जैसे थे पडून होत्या.
पेन्शन योजना सुरू करावी
ठाण्यात आज बहुतांश गणेश कार्यशाळेतील जुने मूर्तिकार साठीच्या पुढे आहेत. त्यांची मुलेही या व्यवसायाकडे वळत नाहीत. त्यामुळे गणेश व्यवसायातील मूर्तिकारांची आर्थिक निकड लक्षात घेता राज्य सरकारने आता मूर्तिकारांसाठी पेन्शन योजना सुरू करावी, जेणेकरून भविष्यात त्यांचा लाभ मूर्तिकारांना मिळू शकेेल तसेच या व्यवसायात परप्रांतीयांचे वाढते अतिक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने नियमावली करण्याची गरज आहे.
काही वर्षांपूर्वी केवळ गणेशमूर्तीवर कलाकुसर पाहून त्याला किंमत देणारे भाविक होते. मात्र, वाढत्या स्टॉलधारकांच्या संख्येमुळे आता केवळ गणेशमूर्तीच्या किमतीला महत्त्व आल्याचे मूर्तिकार सुरेखा बोरीटकर यांनी मान्य केले. स्टॉलधारकांमुळे गणेशमूर्तीच्या व्यवसायामध्ये 30 ते 35 टक्के फटका बसल्याचे त्यांनी सांगितले तसेच सार्वजनिक गणेशमूर्तीही आता स्टॉलधारकांकडून उपलब्ध होत असल्याने अनेक सार्वजनिक गणेशमंडळांची संख्याही रोडावली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ठाणे महानगरपालिका प्रशासनाने स्टॉलधारकांना परवानगी देण्याआधी जुन्या गणेश मूर्तिकारांचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणीही बोरीटकर यांनी यावेळी केली.