मुंबई: विधानसभा निवडणूकीसाठी मतदान झाल्यानंतर मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा. तसेच मतदान ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या परिसरातील मोबाईल टॉवरही बंद ठेवावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, तसंच परळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.
मागील काही निवडणूकांपासून देशात ईव्हीएम मशिन हॅकींगची चर्चा होत आहे, त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे. मतदानासाठी वापरण्यात येणार्या मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर्स आणि वायफायच्या माध्यमातून छेडछाड होण्याची भिती असून, निवडणूक प्रक्रियेतून निष्पक्षता कायम रहावी या दृष्टीने आयोगाने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.