मुंबई: काल बुधवारी राज्यातील सहा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात ६ पैकी ५ ठिकाणी भाजपा जोरदार धक्का बसला आहे. धुळे वगळता पाचही जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी सहाही जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्य भाजपचे निवडून आले आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा विधानसभेप्रमाणे ‘स्ट्राईक रेट’चे गणित मांडले आहे. ‘स्ट्राईक रेट’पाहता भाजपच नंबर एकवर असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
जिल्हा परिषदा, तालुका पंचायत समित्या, नगरपालिका किंवा महापालिका निवडणुकांचा कल हा राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाच्या बाजूने असतो, असा संकेतच जिल्हा परिषद निवडणुकांमधून दिसत आहे. भाजप-शिवसेना युतीच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजपने स्वतंत्रपणे निवडणुका लढवून राष्ट्रवादीचे हे वर्चस्व पुसून टाकले होते. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी राज्याच्या सत्तेवर स्थिरावते, तोच काल निकाल जाहीर झालेल्या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर प्रभाव दाखवून दिला आहे. कारण, धुळे जिल्हा वगळता इतर पाचही जिल्हा परिषदांमध्ये भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे. महाविकास आघाडीने उर्वरीत 4 जिल्ह्यांमध्ये तर अकोला जिल्ह्यात भारिप बहुजन महासंघाने वर्चस्व मिळवले आहे.
नागपूर, धुळे, नंदूरबार, अकोल, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदांचे पंचायत समितींचे निकाल बुधवारी जाहीर झाले. त्यानुसार, भाजपाला सर्वाधिक जागांवर विजय मिळाला आहे. सहा जिल्ह्यांच्या पंचायत समितींच्या 194 जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या 106 जागांवर भाजपाला विजय मिळाला आहे. त्यामुळे आम्हीच नंबर 1 असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच, सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदनही केले आहे.