स्ट्रीट फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

0

जळगाव । फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2017 अंतर्गत महाराष्ट्र मिशन 1 मिलीयन फुटबॉल या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यात वातावरण निर्मितीस सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने रविवारी रत्नावली चौकात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांच्या उपस्थितीत स्ट्रीट फुटबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन करण्यात आले. जिल्हा क्रीड़ा अधिकारी, कार्यालय व जळगांव जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, असोसिएशनचे सचिव फारूक शेख आदि उपस्थित होते. स्पर्धेच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचे हस्ते श्रीफळ वाढवून व अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय या बोर्डचे अनावरण केले. त्यानंतर फुटबॉलला किक मारुन या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

फुटबॉल खेळा, आरोग्यदायी जीवन जगा
फुटबॉल स्पर्धेच्या प्रसारासाठी सर्व शाळा, महाविद्यालये तसेच सेवाभावी संस्थांनी आपला सहभाग नोंदवून जिल्ह्यात फुटबॉलमय वातावरण तयार होण्यास मदत करावी. तसेच फुटबॉल खेळा, आरोग्यदायी व निरामय जीवन जगा. असा सल्ला जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी दिला. तसेच या स्पर्धेामध्ये जळगावकरांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

एसपींचा स्पर्धेत सहभाग
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी भाग घेऊन खेळाडूचा उत्साह वाढविला. स्पर्धेत चौबे शाळेच्या विद्यार्थिनी, जैन स्पोटर्स अकादमीचे फुटबॉल खेळाडूंनी सहभाग घेतला. मान्यवरांना फुटबॉल खेळाडूची प्रतिकृती देऊन गौरविण्यात आले. भारतात 17 वर्षाखालील फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत जळगांव जिल्ह्यात 600 शाळांमध्ये 3 हजार फुटबॉलचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील यांनी यावेळी दिली.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास असोसिएशनचे प्रा. डॉ अनिता कोल्हे, शेखर देशमुख, अब्दुल मोहसिन, सैयद लियाकत अली, राष्ट्रीय खेळाडू दीपिका नंदवालकर, सुषमा ढेरे, रोहिणी सोनवणे, अरबाज़ खान, अरविंद देशपांडे, विवेक आडवाणी, नरेंद्र चौहान, प्रवीण ठाकरे, रविन्द्र धर्माधिकारी, सागर लिगाड़े समीर शेख व नुतन शेवाळे, क्रीड़ा अधिकारी एम. के. पाटिल, श्री. खांडेकर, श्रीमती रेखा पाटिल, श्री. चांदूरकर यांचेसह जळगावकर नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.