स्ट्रीट लाईटवरुन प्रशासन धारेवर

0

स्थायी समितीच्या बैठकीत विविध खर्चास मान्यता

जळगाव । पिंप्राळा परिसरातील धनगर वाडा भागात वारंवार मागणी करुनही स्ट्रीट लाईट बसविले जात नसल्याने संतप्त झालेल्या नगरसेवक अमर जैन यांनी शुक्रवार, 20 रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या स्विकृत नगरसेविका लता मोरे यांनीही मनपाची स्थिती बेताची असल्याने रस्ते, गटारीचे कामे बंद आहेत. मात्र, तोडक्या निधीतुन खंडेराव नगर, पिंप्राळा भागात स्ट्रीट लाईट लावण्याचे काम तरी करावे अशी मागणी केली. त्यावर आयुक्तांनी शहरातील स्ट्रीट लाईटबाबत लवकरच निविदा काढण्यात येणार असुन, त्यातुन स्ट्रीट लाईट बसविले जातील अशी माहिती दिली.

9 विषयांना मान्यता
महापालिकेची स्थायी समितीची सभा सभापती ज्योती इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मनपा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, उपायुक्त चंद्रकांत खोसे, लक्ष्मीकांत कहार, नगरसचिव सुभाष मराठे, शहर अभियंता बी.डी. दाभाडे आदी उपस्थित होते. सभेत विषयपत्रिकेवर 9 विषयांना मान्यता देण्यात आली.

विविध खर्चास मान्यता
राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी मनपात घेतलेल्या बैठकीत सफाई कामगारांनी गणवेश मिळत नसल्याची तक्रार केली होती. त्यावर पवार यांनी मनपा प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. स्थायी समितीत सफाई कर्मचार्‍यांच्या गणवेशासाठी 10 लाख 35 हजार रुपयांचा खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच आगामी मनपा निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने 14 फेब्रुवारी 2018 रोजी मनपा प्रशासनाला पाठविलेल्या पत्रात 2018-19 या आर्थिक वर्षाच्या अंदाज पत्रकात निवडणूक खर्चासाठी 5 कोटींची तरतूद करण्याची सूचना दिली होती. त्या खर्चाला स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. यासह मनपा मालकीच्या विविध वाहनांकरिता वेळोवेळी डिझेल खरेदी करण्याकरिता येणार्‍या 3 कोटी 30 लाख रुपयांच्या खर्चास देखील स्थायी समितीने मान्यता दिली.